वीजतारांना स्पर्श होऊन ट्रकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:16 AM2019-05-03T00:16:12+5:302019-05-03T00:16:49+5:30
येथील प्राणहिता कॅम्प लगत असलेल्या नवीन महिला व बाल रुग्णालयाच्या बाजूला ११ केव्ही वाहिनीच्या जिवंत तारांना ट्रकचा स्पर्श होऊन एक ट्रक आगीच्या स्वाधीन झाला. सदर घटना गुरूवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : येथील प्राणहिता कॅम्प लगत असलेल्या नवीन महिला व बाल रुग्णालयाच्या बाजूला ११ केव्ही वाहिनीच्या जिवंत तारांना ट्रकचा स्पर्श होऊन एक ट्रक आगीच्या स्वाधीन झाला. सदर घटना गुरूवारी घडली.
नवीन महिला व बाल रुग्णालयासाठी ट्रकद्वारे रेती आणणे सुरु आहे. एमएच ३३ ओ ०१९९ क्रमांकाच्या ट्रकने रेती आणण्याचे काम सुरु होते मात्र रेती खाली करून ट्रक पुढे नेत असतांना ट्रॉलीचा स्पर्श तारांना होऊन ट्रकला आग लागली.
आग लागताच नगर पंचायत अहेरीच्या अग्नीशमन दलास माहिती देण्यात आली मात्र अग्निशमन वाहनाचे चालक शववाहिका घेऊन गडचिरोलीला गेल्याने अग्नीशमन वाहन त्वरित पोहोचू शकले नाही. लगेच याची माहिती पोलीस जवान शेरा पठाण यांना माहीत होताच त्यांनी प्राणहिता कॅम्प मधून तसेच सीआरपीएफ बटालियन ९ व ३३ मधून तीन पाण्याचे टँकर आणून आग नियंत्रणात आणली. शकील शेख यांच्यासह सीआरपीएफ जवान व स्थानिक युवकांनीही खूप मेहनत घेतली. मात्र आग विझवेपर्यन्त ट्रक आगीच्या स्वाधीन झाला होता. शेवटी सीआरपीएफच्या जवनांनी नगर पंचायत अहेरीचे अग्निशमन वाहन चालवत आणून आग पुर्णत: विझवली. यात ट्रक मालकाचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. विद्युत विभागाचे अभियंता अमित शेंडे यांनी अहेरी शहराची लाईन बंद केली. या अपघातात ट्रक चालकाने ट्रकच्या बाहेर उडी घेतल्याने त्याच्या जीवास हानी झाली नाही.