अस्थायी पट्टेधारकांचे तिप्पट अतिक्रमण
By Admin | Published: May 8, 2017 01:20 AM2017-05-08T01:20:02+5:302017-05-08T01:20:02+5:30
देसाईगंज येथे राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट अतिक्रमण केले आहे.
भूमिअभिलेखच्या मूळ नकाशावरून झाले स्पष्ट : कार्यकारी अभियंत्याची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज येथे राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग अक्षरश: अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. मंजूर जागेपेक्षा करण्याात आलेले तिप्पट अतिक्रमण आधी काढण्यात यावे, त्यानंतर आम्ही आमचे अतिक्रमण स्वत:हून काढून घेणार, अशी ताठर भूमिका लहान तात्पुरत्या अतिक्रमणधारकांवर घेतली असल्याने राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहे.
देसाईगंज नझूल शहरातील बाजार उपविभागातील खसरा क्रमांक २२/८० प्रकरण क्रमांक २ नुसार १७ मार्च १९५१ ला १५ बाय १२ असे एकूण १८० चौ.फुट चौरस मीटर क्षेत्रफळाचे १९ अस्थायी पट्टे व्यावसायिक प्रयोजनार्थ देण्यात आले होते. सदर अस्थायी पट्टे सन १९५०-५१ ते १९६०-६१ या दहा वर्षाच्या मुदतीकरिता अस्थायी स्वरूपात देण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट जागेत अतिक्रमण केलेले आहे. यामध्ये मजूर खसरा क्रमांक २२/८० मधील प्लाट क्रमांक ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९, ५०, ५१ आदींचा समावेश आहे. १९ पैकी ११ अस्थायी पट्टेधारकांनी येथे तिप्पट अतिक्रमण केले आहे.
वर्षभरापूर्वी साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-आलापल्ली-रेकनपल्ली-सिरोंचा या नवघोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याबाबत सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी देसाईगंज शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगतच्या ११ अस्थायी पट्टेधारकांनाही राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण केल्याने २४ एप्रिलला नोटीस बजावली असून आधी या अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट केलेले अतिक्रमण काढून राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांच्या हाती रस्त्याचा मूळ नकाशाच लागला असून अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट अतिक्रमण केल्याची बाब उघडकीस आली आहे. छोट्या पण अस्थायी अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर मोठ मोठी इमारत बांधून अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या नझूलच्या अस्थायी पट्टेधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाप्रमाणे आपले अतिक्रमण कधीही काढल्या जाऊ शकते. या भितीने शहरातील अस्थायी अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अतिक्रमण निष्कासीत केले जाणार
सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी २४ एप्रिलच्या नोटीसनुसार देसाईगंज शहरातील मूख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सीच्या राजमार्गच्या जमिनीवर किमी ६३/४०० वर उजव्या/डाव्या बाजूस ३ बाय ३ मी एवढ्या जागेवर अनधिकृतरित्या अतिक्रमण करून कब्जा केल्याने अतिक्रमण धारकांना उत्तरवादी ठरवून नोटीस प्राप्त झाल्यापासून २९ एप्रिलच्या आत अनधिकृत कब्जा हटवावा, अशी सूचना देऊन नोटीस तामिल झाल्यापासून तीन दिवसाच्या आत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग क्रमांक १४ नागपूर येथे जागेबाबत अधिकृत कागदपत्रांसह अभिवेदन करण्याची संधी देण्यात आलेली होती. अशा अभिवेदनधारकांना २९ एप्रिलला पूर्ण सुनावणी झाली. या नोटीसचे अनुपालन करण्यात अतिक्रमणधारक अयशस्वी ठरल्याने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी व यातायात) अधिनियम २००२ ची कलम २६ ची उपकलम (२) नुसार शास्ती लादून अतिक्रमण निष्काशीत केले जाणार असल्याची माहिती आहे. नोटीस प्राप्त झालेल्या एकाही अतिक्रमणधारकाने नागपूरच्या विभागीय कार्यालयात हजेरी लावली नाही.
देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गावरील अतिक्रमणधारकांना राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. अतिक्रमण केलेली बहुतांश जमीन नझूल विभागाची असल्याने नझूल विभागाकडून मूळ नकाशा घेतलेला आहे. अस्थायी पट्टेधारकांनी मंजूर जागेपेक्षा तिप्पट अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमण सर्व प्रथम काढल्या जाईल. त्यानंतर आपला मोर्चा इतर अतिक्रमणधाकरंकडे वळविल्या जाईल. महामार्गाच्या निर्मितीसाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे.
- नरेश लभाने, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, भंडारा