तिहेरी हत्याकांड! चार संशयित ताब्यात, कारण अस्पष्ट, मृतांवर गुंडापुरीत अंत्यसंस्कार

By संजय तिपाले | Published: December 8, 2023 06:30 PM2023-12-08T18:30:55+5:302023-12-08T18:31:11+5:30

घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी गावातून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Triple murder Four suspects detained, reason unclear, dead cremated in Gundapuri |  तिहेरी हत्याकांड! चार संशयित ताब्यात, कारण अस्पष्ट, मृतांवर गुंडापुरीत अंत्यसंस्कार

 तिहेरी हत्याकांड! चार संशयित ताब्यात, कारण अस्पष्ट, मृतांवर गुंडापुरीत अंत्यसंस्कार

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीत वृध्द आजी- आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना ७ डिसेंबरला उघडकीस आली होती. या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी गावातून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तथापि, ८ डिसेंबरला एकाचवेळी तिघांवर गुंडापुरी येथे अंत्यस्कार करण्यात आले.

अर्चना रमशे तलांडी (१०,रा.येरकल ता.एटापल्ली), देवू दसरु कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५,रा. गुंडापुरी ता. भामरागड) अशी मयतांची नावे आहेत. देवू कुमोटी यांची मरकल (ता.एटापल्ली) येथील नात अर्चना ही आजी- आजोंबाकडे दिवाळी सुटीत आली होती. अर्चना तलांडेसह देवू व बिच्चे कुमोटी या तिघांचा गळा चिरलेला मृतदेह ७ डिसेंबरला शेतातील घरात आढळून आला. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविले. त्यानंतर गुंडापुरीत अंत्यसंस्कार झाले. एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने गुंडापुरी व परिसर हादरुन गेला आहे.  एटापल्लीच्या बुर्गी (कांदोळी) ठाण्यात अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी गावातून चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे विचारपूस सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला सांगितले.

घटोला जादूटोण्याचीही किनार...
दरम्यान, सुरुवातीला या हत्येमागे नक्षली असल्याची अफवा पसरली होती , परंतु पोलिसांनी ती फेटाळून लावली. संपत्तीच्या वादातून हत्यांकाड घडले असावे, असा अंदाज होता. तथापि, मयत देवू कुमोटी हे जादूटोणा करत असत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बाजूनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती ठोस कारण लागलेले नाही.
 

Web Title: Triple murder Four suspects detained, reason unclear, dead cremated in Gundapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.