पुरेशा मनुष्यबळाअभावी ग्राहकांना मनस्ताप

By admin | Published: June 9, 2017 01:10 AM2017-06-09T01:10:51+5:302017-06-09T01:10:51+5:30

चामोर्शी येथील भारतीय स्टेट बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Troubles with customers due to lack of adequate manpower | पुरेशा मनुष्यबळाअभावी ग्राहकांना मनस्ताप

पुरेशा मनुष्यबळाअभावी ग्राहकांना मनस्ताप

Next

बँकेतील गर्दीमुळे धान्य दुकानदार हैराण : चामोर्शीच्या स्टेट बँकेतील प्रकार; स्वतंत्र काऊंटर सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी येथील भारतीय स्टेट बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना चालान भरण्यासाठी तब्बल तीन ते चार तास रांगेत लागावे लागते. मात्र अनेकदा रांगेत लागूनही नंबर लागत नाही. त्यामुळे बँकेच्या कारभाराप्रति रोष व्यक्त केला जात असून चालान स्वीकारण्याचे वेगळे काऊंटर सुरू करण्याची मागणी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे.
चामोर्शी येथील भारतीय स्टेट बँकेत तालुक्यातील शेकडो ग्राहकांचे खाते आहे. मात्र त्या मानाने बँकेत कर्मचारी संख्या कमी असल्याने पैसे काढण्यासाठी किंवा चालान भरण्यासाठी ग्राहकांची लांबच लांब रांग लागत असते. या बँकेत स्वस्त धान्य दुकानदारांसह स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचीही चालान भरण्यासाठी गर्दी असते. मात्र पैसे काढणारे, भरणारे आणि चालन भरणारेही एकाच रांगेत लागत असतात. एकाच काऊंटरवरून पैसे स्वीकारण्याचा प्रकार सध्या या बँकेत सुरू आहे. यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून दररोज बँक सुरू होताच आतील कक्षात बँकेच्या प्रवेशद्वारापर्यंत लांबच लांब रांग पाहायला मिळते.
तहसील प्रशासनाकडून स्वस्त धान्याची सोडवणूक करण्यासाठी दुकानदारांना आधी चालान भरावे लागते. एकदा दिलेले चालान तीन दिवसात भरावे लागते. मात्र रांगेत लागूनही अनेकदा नंबर लागत नसल्याने तीन दिवस उलटल्यानंतर नवीन चालान तयार करण्याची पाळी स्वस्त धान्य दुकानदारांवर येत आहे. असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून याबाबत बँक व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यास कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण देत असतात. याकडे लक्ष देऊन चालान स्वीकारण्यासाठी वेगळा काऊंटर सुरू करण्याची मागणी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत आहे. या समस्येसंदर्भात चामोर्शीच्या तहसीलदारांनी बँकेला निर्देश द्यावेत, अशी मागणी आहे.

Web Title: Troubles with customers due to lack of adequate manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.