वैज्ञानिक प्रक्रियेनेच सत्य गवसते
By admin | Published: November 22, 2014 01:16 AM2014-11-22T01:16:58+5:302014-11-22T01:16:58+5:30
एखाद्या गोष्टीचा मनावरील प्रभाव हा त्या गोष्टीवर विश्वास दृढ करतो. वास्तविक नसलेल्या ज्या गोष्टींवर व्यक्तीचा जेव्हा विश्वास दृढ होतो तेव्हा ...
गडचिरोली : एखाद्या गोष्टीचा मनावरील प्रभाव हा त्या गोष्टीवर विश्वास दृढ करतो. वास्तविक नसलेल्या ज्या गोष्टींवर व्यक्तीचा जेव्हा विश्वास दृढ होतो तेव्हा अंधश्रद्धा अंगी बाणवते व व्यक्तीची वृत्ती अंधश्रद्धाळू होते. त्यामुळे अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक व चिकित्सक दृष्टी ठेवल्यास सत्य गवसते, असे प्रतिपादन जादूटोणा विरोधी जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले.
स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित ‘जादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या’ या व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. भारतात ढोंगीबाबांचे चमत्कार आणि अंधश्रध्देचे भूत मानवी मनात खोलवर रूजविल्या गेले आहे. परंतु एखादा बाबा हवेत हात फिरवून कुठलीही वस्तू कशी आणतात, मंत्रोच्चाराने अग्नी कसा प्रज्वलित होतो, इतकेच नव्हे तर अंगात शिरलेले भूत कसे केले जाते. यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे, असे सांगून माणवी जीवन जगताना व्यक्तींनी चमत्कारांकडे न वळता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, असे आवाहन अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी केले.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आर. डी. आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जि. प. समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, सुरेश झुरमुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे, संचालन जिल्हा संघटक प्रा. जगदिश बद्रे यांनी केले.