रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करणार
By admin | Published: March 14, 2016 01:22 AM2016-03-14T01:22:27+5:302016-03-14T01:22:27+5:30
गडचिरोली जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष साडेतीन हजाराच्या वर असून यात आरोग्य विभागाची सर्वात जास्त पदे रिक्त आहेत.
अशोक नेते यांचे आश्वासन : आरमोरीत वैद्यकीय व दंत शिबिराचे उद्घाटन
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष साडेतीन हजाराच्या वर असून यात आरोग्य विभागाची सर्वात जास्त पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यास अडचण जात आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा सुरू असून या संदर्भात पुन्हा आपण प्रयत्न करणार असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येथील उपजिल्हा रूग्णालयात रविवारी वैद्यकीय व दंत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य लक्ष्मी मने, पुन्नम गुरनुले, पं.स. सभापती सविता भोयर, रवींद्र बावणथडे, नंदू पेटेवार, रामभाऊ पडोळे, सदानंद कुथे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा मैदमवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश मोटे, डॉ. वानखेडे, डॉ. नागदेवते, डॉ. मनीषा गेडाम, पंकज खरवडे, सुनील नंदनवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रमोद गवई, संचालन डॉ. अर्पणा टेंभरे यांनी केले. (वार्ताहर)
१०० खाटांचे रूग्णालय होण्यासाठी पाठपुरावा
आरमोरी रूग्णालयात अपुऱ्या खाटांच्या व्यवस्थेमुळे रूग्णांची गैरसोय होते. रूग्णांना परिपूर्ण सेवासुविधा मिळण्यासाठी या रूग्णालयाला १०० खाटांचे रूग्णालय करण्यासाठी आपण आरोग्यमंत्र्याची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या रूग्णालयात ट्रामा सेंटरची मंजुरी आवश्यक आहे. त्याकरिता आपला शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी ग्वाही आमदार क्रिष्णा गजबे यांनी अध्यक्षीय भाषणात दिली.