दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:23 AM2017-07-21T01:23:55+5:302017-07-21T01:23:55+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सर्वांच्या बरोबरीने उभे रहावे. यासाठी त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण
विष्णू सवरा : जिल्ह्यातील आदिवासी मुलामुलींच्या १० वसतिगृहांचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सर्वांच्या बरोबरीने उभे रहावे. यासाठी त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण आणि त्याच तोडीचे दर्जेदार शिक्षण देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्या जिद्दीने स्वत:ची प्रगती करुन घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी गुरूवारी येथे केले.
चातगांव येथे बांधण्यात आलेल्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी याच ठिकाणी जिल्हयातील विविध ठिकाणच्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या वसतिगृहांचे प्रतिकात्मक उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तत्पुर्वी धानोरा येथील विद्यार्थिनी वसतिगृह तसेच लगतच्या सोडे येथील विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी आमदार हिरामन वरखेडे, आदिवासी सेवक तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, समाजसेवक देवाजी तोफा, आदिवासी विकास अप्पर आयुक्त डॉ.माधवी खोडे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ.बिपीन ईटनकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यात वाढ होत आहे ही चांगली बाब आहे यात गुणात्मक सुधार आवश्यक आहे. शाळांचा निकाल ९७ ते १०० टक्के लागत आहे. आता आदिवासी विद्यार्थी राज्यातून, विभागातून पहिला यावा हे ध्येय समोर असले पाहिजे, असे सवरा म्हणाले. आमदार डॉ.होळी आणि गजबे यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेण्यात आली आहे. याच अनुषंगाने वर्ग ३ व ४ ची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश आपण दिले आहेत, अशीही माहिती सवरा यांनी यावेळी दिली.
सोडे येथील कार्यक्रमात आदिवासी नृत्याने ना.सावरा याचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींनी मराठी संस्कृती तसेच आदिवासी नृत्य यांचे दर्शन घडविले. प्रास्ताविक डॉ.बिपीन ईटनकर यांनी तर सूत्र संचालन कुलकर्णी यांनी व आभार प्रदर्शन गृहपाल जाधव यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता.
या वसतिगृहांचे झाले प्रतिकात्मक लोकार्पण
वसतिगृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मोहली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अंगारा येथील नवीन वर्गखोली व वसतिगृह, आश्रमशाळा मसेल येथील मुलींचे वसतिगृह, आश्रमशाहा गॅरापत्ती येथील मुला-मुलींचे वसतिगृह व आश्रमशाळा भाकरोंडी येथील शाळा संकुल नूतन इमारतीचे प्रतिकात्मक लोकार्पण यावेळी झाले. यामुळे १२८० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या निवासाची सोय होणार आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न व्हायला हवे- पालकमंत्री
आदिवासी विद्यार्थी बुध्दीवंत आहेत. त्यांना मार्गदर्शन मिळण्याची अधिक आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी किमान ३ वर्ष कालावधीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करावे. यातून चांगले अधिकारी घडू शकतील असे पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या सूचनेची दखल घेऊन असे केंद्र येणाऱ्या काळात सुरु करण्याचा निर्णय घेऊ, असे सवरा यांनी आपल्या भाषणात सांगितले.