ग्रामीण भागात क्षयरोग शोधमोहीम राबवा
By admin | Published: March 25, 2017 02:16 AM2017-03-25T02:16:24+5:302017-03-25T02:16:24+5:30
ग्रामीण भागात अनेक क्षयरोग रूग्ण खिळून पडले आहेत. त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचे आव्हान
जि.प. उपाध्यक्षांचे प्रतिपादन : जिल्हा रूग्णालयात जागतिक क्षयरोग दिवस साजरा
गडचिरोली : ग्रामीण भागात अनेक क्षयरोग रूग्ण खिळून पडले आहेत. त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचे आव्हान आरोग्य विभागाने पार पाडावे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोली यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन २४ मार्च रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अजय कंकडालवार बोलत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम, जिल्हा क्षयरोग केंद्राचे डॉ. जीवणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. क्षयरोग दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ठ डॉटस् प्रोव्हायड म्हणून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. अहेरी व कुरखेडा येथे सीबीनॅट व एलईडी सुक्ष्मदर्शी यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती डॉ. कमलेश भंडारी यांनी कार्यक्रमादरम्यान दिली. संचालन गणेश खडसे तर आभार प्रविण कांबळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. अनिल चव्हाण, महादेव वाघे, राहूल रायपुरे, लता येवले, वंदना राऊत, रोहिणी नान्हे, विलास भैसारे, विनोद काळबांधे यांनी सहकार्य केले.