तुळशीतील १७० एकर धान तुडतुड्याने केले नष्ट
By admin | Published: November 2, 2014 10:34 PM2014-11-02T22:34:49+5:302014-11-02T22:34:49+5:30
देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे.
तुळशी : देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
तुळशी गावात यावर्षी जवळपास ३७५ हेक्टर शेती धानपीकाखाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीपासून फवारणीपर्यंत जवळपास ३० हजार रूपये खर्च शेतीवर आला. धान ऐन कापणीला आलेले असताना १५ दिवसांपूर्वी तुडतुडाचे जोरदार आक्रमण धानपीकावर झाले व जवळजवळ १७० एकर शेत जमिनीवरचे धान पूर्णत: नष्ट झाले आहेत. तुळशी येथील शेतकरी अल्पभुधारक असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. तुळशी येथील विष्णू दुनेदार यांचे ५ एकर, नरेंद्र दुनेदार यांचे ३ एकर, लालाजी नाकाडे यांचे ३ एकर, महादेव राऊत २ एकर, यशवंत राऊत २ एकर, बाबुराव पत्रे ३ एकर, ज्ञानेश्वर सुकारे २ एकर, केवलराम दोनाडकर १ एकर, हर्षवर्धन लोणारे ३ एकर, हुमणे २ एकर, हरिजी पिल्लारे ३ एकर, कान्हाजी दुनेदार ३ एकर, रसिका झुरे १ एकर, मोरेश्वर दुनेदार १ एकर, प्रकाश पत्रे २ एकर, मोतीलाल दोनाडकर या शेतकऱ्याचे १ एकरावरील धान पूर्णत: तुडतुड्यामुळे हातून निघून गेले आहे. तुडतुड्याची लागन होताच कृषी विभागाने तत्काळ मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विविध कंपन्यांची औषधीसुध्दा फवारली. परंतु त्याचाही काहीही उपयोग झाला नाही, असे शेतकरी वसंत मिरगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाने तत्काळ सर्व्हेक्षण करून एकरी २० हजार रूपयाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणविस यांना निवेदन सादर करणार आहेत.(वार्ताहर)