हळदीमालच्या पुलामुळे पावसाळ्यात अडते वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:47+5:302021-06-01T04:27:47+5:30
चामाेर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी-हळदीमाल गावादरम्यान मोठा नाला आहे. या नाल्यावर ३० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. हा पूल ...
चामाेर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी-हळदीमाल गावादरम्यान मोठा नाला आहे. या नाल्यावर ३० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. हा पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत असते. यामुळे वाहतूक ठप्प होते. त्यामुळे याठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून एस. टी. महामंडळाच्या बसेस, दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करत असतात. हा नाला वैनगंगा नदीला जोडला असून पूल आणि नदी यामधील अंतर एक किलोमीटर आहे. वैनगंगा नदीला भरती आल्यानंतर या पुलापर्यंत दाब निर्माण होतो.
धानाेरातील नवीन वस्त्या दुर्लक्षित
धानाेरा : शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये अद्यापही पक्के रस्ते बांधण्यात आले नाहीत. या भागातील नागरिक सार्वजनिक मूलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत. स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून सोईसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाढीव वस्त्यांमधील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. येथील बहुतांश रस्ते कच्चे आहेत. पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते, तर हिवाळा व उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करावा लागताे. मागील ३ वर्षांपासून येथे पक्के रस्ते व नाल्या बांधण्याची मागणी आहे. नागरिकांना पावसाळ्यात माेठा त्रास सहन करावा लागताे. तरीही दखल घेतली जात नाही. या मागणीकडे दुर्लक्षच असल्याचे दिसून येते. वाॅर्डातील नागरिकांना त्रास हाेत असल्याने स्थानिक प्रशासनाने पक्के बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
व्यंकटापूर परिसरातील वीज समस्येने नागरिक त्रस्त
अहेरी : तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: रात्रीच्या सुमारास वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत; परंतु सुरळीत वीजपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यात देवलमरी-इंदाराम परिसरात इंदाराम, काटेपल्ली, कोलपल्ली, व्यंकटरावपेठा, वट्रा खुर्द, वट्रा बुज, व्यंकटापूर, आवलमरी, संड्रा, मोदूमतुर्रा आदी गावांचा समावेश होतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना कुलर, पंखे लावावे लागतात. त्यामुळे नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी हाेत आहे; परंतु या समस्येकडे अभियंते दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रुंदीकरण करा
कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी-शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कुरखेडा-शिरपूर बसचे आवागमन होते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे.
आलापल्लीत फवारणी करण्याची मागणी
आलापल्ली : येथील अनेक वॉर्डातील नाल्यांचा गाळ उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये फवारणी करावी.
झिंगानूर परिसरातील बंधारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष
झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे.