दोन हंगामी शेतीकडे शेतकऱ्यांना वळवा

By admin | Published: April 22, 2017 01:18 AM2017-04-22T01:18:34+5:302017-04-22T01:18:34+5:30

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. त्यामुळे आता पाणीसाठा उपलब्ध आहे.

Turn on farmers to two seasonal farms | दोन हंगामी शेतीकडे शेतकऱ्यांना वळवा

दोन हंगामी शेतीकडे शेतकऱ्यांना वळवा

Next

 पालकमंत्र्यांचे निर्देश : खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक
गडचिरोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. त्यामुळे आता पाणीसाठा उपलब्ध आहे. अशा स्थितीत शेतकरी एक हंगामी शेतीवर न थांबता त्याला सिंचन सुविधेच्या आधारे रब्बी हंगामात पेरणीची माहिती देऊन दोन हंगामी शेतीकडे शेतकऱ्यांना वळवा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल आदी उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्र्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. गावभेटीदरम्यान किती शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. नेमकेपणाने माहिती काय दिली, याबाबत सांगा, असे खासदार अशोक नेते या बैठकीत म्हणाले. कृषी विभागाने सर्व माहिती अद्यावत ठेवली पाहिजे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यात ठिबक सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याची गरज असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले.
यावेळी मागील खरीप हंगामात २ लाख ६ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ही त्याच पध्दतीचे नियोजन असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी सांगितले. ९० टक्के क्षेत्र हे धानाचे राहिल. खते, बियाणे पुरविण्याचे तालुकास्तरीय नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ११७ कोटी पेक्षा अधिक वित्त पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासंदर्भात बँकांना सूचना देण्यात आले आहे. कर्ज घेणारे व कर्ज न घेणारे अशा दोन्ही शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचे संरक्षण मिळण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख एस. आर. खांडेकर यांनी या बैठकीत दिली.
२०१६-१७ साठी १६९ गावांची जलयुक्त शिवार करिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये ६ हजार ६६९ कामांसाठी ११८.९६ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. २०१५-१६ मध्ये १५२ गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले होते. त्यातून ३ हजार ३५८ हेक्टर संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण झाली आहे, अशी माहितीही पोटे यांनी दिली. या बैठकीत आत्माचे प्रकल्प संचालक प्रकाश पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Turn on farmers to two seasonal farms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.