शेळी व कुक्कुटपालनाकडे वळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 10:44 PM2017-11-06T22:44:30+5:302017-11-06T22:44:42+5:30
दुर्गम गावातील नागरिकांना शेतीसह जोडधंदा करता यावा, या हेतूने सीआरपीएफ ९ बटालियनच्या वतीने सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत शेळ्या व कोंबड्यांचे वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : दुर्गम गावातील नागरिकांना शेतीसह जोडधंदा करता यावा, या हेतूने सीआरपीएफ ९ बटालियनच्या वतीने सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत शेळ्या व कोंबड्यांचे वितरण करण्यात आले.
सीआरपीएफ ९ बटालियनचे कमांडंट रवींद्र भगत यांच्या मार्गदर्शनात राजाराम, सूर्यापल्ली, पत्तीगाव, नीमलगुडम आदी गावांमध्ये चार शेळ्या व एक बोकड अशा एकूण ३० नगांचे वितरण सहा कुटुंबांना करण्यात आले. तसेच राजाराम, डुुडेपल्ली, बुर्गी, रेपनपल्ली, पेरमिली येथे एकूण २५ शेळी व बोकडांचे वितरण करण्यात आले. कुकुटपालनाकरिता एका कुटुंबाला आठ कोंबड्या व दोन कोंबडे यासह एक खुराडे तसेच १० किलो खाद्याचे बुर्गी, उडेरा, करपनकुंडी, कांदोळी, मिरकल येथे २० परिवारांना वितरण करण्यात आले. राजाराम, पेरमिली, ताडगाव, रेपनपल्ली व अहेरी आदी गावांमध्ये १० परिवारांना प्रत्येकी आठ कोंबड्या, दोन कोंबडे व एक खुराडे, १० किलो खाद्य वितरित करण्यात आले. या गावांमध्ये एकूण १६० कोंबड्या, ४० कोंबडे वितरित करण्यात आले. आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तसेच सामाजिक कल्याण व सद्भावना कायम राखण्याच्या हेतूने सीआरपीएफ ९ बटालियनच्या वतीने आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शेतीसह जोडधंदा करण्याकरिता शेळ्या व कोंबड्यांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला कमांडंट रवींद्र भगत, सीएमओ एन.के. प्रसाद, उपकमांडंट राकेश कुमार, बी.सी. रॉय, सहायक कमांडंट राजकुमार, सहायक कमांडंट विकास कुमार तसेच राजाराम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनंजय वेठेकर, रायगड्डाच्या सरपंच शकुंतला कुळमेथे, राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेश मानकर, मुख्याध्यापक सुनील अंजेवार व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.