पुराने अनेक मार्ग बंद
By admin | Published: August 15, 2015 12:12 AM2015-08-15T00:12:06+5:302015-08-15T00:12:06+5:30
जनजीवन विस्कळीत : गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याचा परिणाम
अहेरीतील घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी
नगर पंचायतीने यावर्षी नाल्यांचा उपसा करण्याकडे दुर्लक्ष केले. अहेरीत गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. मुसळधार पावसामुळे गाळाने भरलेल्या नाल्या चोकअप झाल्या. परिणामी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले. अहेरी शहराला दुपारी १२ वाजेपर्यंत बेठाचे स्वरूप प्राप्त झाले होते. घरामध्ये पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांचे दैनंदिन उपयोगी साहित्य खराब झाले आहे. याचा दोष नागरिक नगर पंचायत प्रशासनाला देत आहेत. रस्त्यावर पाणी साचले असल्याने आझाद चौक ते दानशूर चौक या मार्गावरील वाहतूक सुध्दा काही कालावधीसाठी बंद झाली होती. अहेरीतील वार्ड क्रमांक तीन मधील आझाद चौक ते दानशूर चौक मार्गावरील प्रदीप पुद्दटवार, राजेंद्र पारेल्लीवार, कवडू नेवले, संजय नरहरशेट्टीवार यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले.
अंकिसा : तीन महिन्यांपूर्वी येर्रावागू नाल्यावरील पूल वाहून गेला. उन्हाळ्यामध्ये प्रशासनाने या पुलाची दुरूस्ती केली नाही. अंकिसा येथे बालमुत्यमपल्ली, गर्रेपल्ली, चेतालपल्ली, गोल्लगुडम व आसरअल्ली येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्याचबरोबर नागरिकही विविध कामांसाठी अंकिसा येथे जातात. या नाल्यावरील पूल तुटला असल्याने नागरिक जीव धोक्यात घालून नायलाजास्तव प्रवास करीत आहेत. मागील दोन दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. तरीही नागरिक नाल्यातून प्रवास करीत आहेत.
४० गावांचा संपर्क तुटला
अहेरी-देवलमरी मार्गावरील गडअहेरीच्या ठेंगण्या पुलावर पाणी असल्याने देवलमरी, इंदाराम, व्यंकटापूर, व्यंकटरावपेठा, चेरपल्ली, गडबामणीसह ४० गावांचा संपर्क तुटला.
चौडमपल्ली पुलावरून पाणी
आष्टी-आलापल्ली मार्गावर असलेल्या चौडमपल्ली नाल्यावरच्या पुलावर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पाणी चढले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प पडली होती. या कालावधीत या मार्गावर वाहनांची फार मोठी रांग लागली होती. अचानक मार्ग बंद झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला.
नगर पंचायतीच्या कारभाराविषयी अहेरीतील नागरिक संतप्त
नगर पंचायतीची स्थापना झाल्यापासून अहेरी शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगुण होते. मात्र प्रत्येक्षात नगर पंचायतीची स्थापना होऊनही कोणताच फरक पडला नाही. नगर पंचायतीने पावसाळ्यापूर्वी नाल्या उपसल्या नाहीत. त्यामुळेच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले. अनेक नागरिकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. नगर परिषदेच्या या अनागोंदी कारभाराविषयी अहेरी येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आता तरी नाल्या उपसाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आष्टी येथे घराचे छत कोसळून आर्थिक नुकसान
गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी येथील वार्ड क्रमांक ५ मधील यशवंत खोब्रागडे यांचे राहते घर शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कोसळले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरामध्ये ठेवलेले साहित्य मात्र पाण्याने भिजले आहेत. यामध्ये २० ते २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने खोब्रागडे कुटुंबियांसमोर निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.