वृक्षारोपण अडचणीत

By admin | Published: August 14, 2015 01:37 AM2015-08-14T01:37:37+5:302015-08-14T01:37:37+5:30

राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ आॅगस्ट रोजी वृक्षारोपण करायचे होते.

Turning Plantation | वृक्षारोपण अडचणीत

वृक्षारोपण अडचणीत

Next

स्वातंत्र्यदिनी कार्यक्रम : वनीकरण विभागाचे रोपटे शाळेत पोहोचलेच नाही
गडचिरोली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ आॅगस्ट रोजी वृक्षारोपण करायचे होते. त्यासाठी लागणारी रोपटे सामाजिक वनीकरण विभाग उपलब्ध करून देणार होता. त्यानुसार सर्वच शाळांनी खड्डे खोदून तयार ठेवले आहेत. मात्र स्वातंत्र्य दिन केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना बहुतांश शाळांना वनीकरण विभागाकडून रोपटेच प्राप्त झाले नाही. त्यामुळे या दिवशीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम अडचणीत आला आहे.
पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे महत्त्व अनन्य साधारण असल्याने यापूर्वीच्या आघाडी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. या योजनेनुसार प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे दरवर्षी उद्दीष्ट देण्यात आले होते. या योजनेवर कोट्यवधी रूपये खर्च झाले. मात्र जीवंत झाडांची संख्या अत्यंत कमी आहे. या योजनेवर झालेला कोट्यवधी रूपयांचा खर्च पाण्यात गेला हे युती शासनाच्या लक्षात आल्यानंतर शाळांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्याचे यावर्षीपासून जाहीर केले.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने किमान २० रोपट्यांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे निर्देश देण्यात आले. वृक्षारोपणाचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्याचेही निर्देश दिले. १५ आॅगस्ट रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा असल्याने शाळेच्या आवारात विद्यार्थी व शिक्षकांनी २० खड्डे खोदून तयार ठेवले आहेत. हा उपक्रम जिल्ह्यातील एकूण १ हजार ५४५ शाळांपैकी बहुतांश शाळांनी केला आहे. शिक्षण विभागातील अधिकारी व मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार वृक्ष उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाची आहे. त्यामुळे वनीकरण विभागाचे अधिकारी आपल्याला रोपटे उपलब्ध करून देतील, त्यांचे वाहन रोपटे घेऊन आल्यानंतरच आपण वृक्षारोपण करू, असे गृहीत धरून वाट बघत आहेत. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अजुनपर्यंत बहुतांश शाळांपर्यंत रोपटे पोहोचलेच नाही. त्यामुळे वृक्षारोपण कसे करायचे असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)
ज्या शाळांना संरक्षण भिंत आहे, अशा शाळांची सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्ये ५०२ शाळा पात्र ठरल्या. त्या शाळांना तीन रूपये या मापक दराने रोपटे उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या शाळांची वनीकरण विभागाने निवड केली. त्या सर्वच शाळांपर्यंत वृक्ष पोहोचले आहेत. इतर शाळांनी स्वत: रोपट्यांची व्यवस्था करावी.
- डी. आर. शिंगाडे,
उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली
जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण करायचे आहे. त्यानुसार सामाजिक वनिकरण विभागाने वृक्ष पुरवायला पाहिजे होते. रोपटे कमी असतील तर प्रत्येक शाळेला दोन ते चार तरी रोपटे द्यावे.
- माणिक साखरे,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
वृक्षारोपणाचा कार्यक्रम गावातील एखाद्या सन्मानिय व्यक्तीच्या हाताने करायचा आहे. त्यासाठी शाळांनी कार्यक्रम ठरवून अतिथींना निमंत्रणसुध्दा दिले आहे. मात्र रोपटेच पोहोचले नसल्याने कार्यक्रमाचे काय होणार या चिंतेत मुख्याध्यापक सापडले आहेत. जवळपासच्या शाळांना फोन लावून रोपट्यांबाबत विचारणा करीत आहेत. रोपटे उपलब्ध न झाल्यास अतिथींचा रोष ओढवून घेण्याची पाळी मुख्याध्यापकांवर येणार असल्याने मुख्याध्यापकवर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे.
शिक्षण विभाग व वनीकरण विभागात समन्वय नसल्याने उडाला गोंधळ
रोपटे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागावर सोपविली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या म्हणण्यानुसार ज्या शाळांना संरक्षण भिंत आहे, अशा शाळांनाच रोपटे पुरविले जाणार होते. या शाळांची निवड लागवड अधिकारी करणार होते. मात्र शिक्षण विभागाने ही बाब लक्षात न घेता जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापकांच्या नावाने पत्र काढून शाळेच्या आवारात २० खड्डे खोदून ठेवावे, असा निर्देश दिला. या निर्देशाचे पालन करीत जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी खड्डे खोदून तयार ठेवले आहेत. सामाजिक वनीकरण विभाग मात्र त्यांनी निवड केलेल्या केवळ ५०२ शाळांनाच वृक्ष उपलब्ध करून देणार आहे. सामाजिक वनीकरण विभाग व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याने हा गोंधळ उडाला आहे.

Web Title: Turning Plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.