वन्यजीव गणना अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:58 PM2018-04-30T22:58:07+5:302018-04-30T22:58:07+5:30
वैशाख पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश राहत असल्याने यादिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ वन्यजीवांची गणना केली जाते. मात्र पाणवठेच आटल्याने वन्यजीव पाणवठ्यांकडे फिरकणार नाही. परिणामी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारी गणना अडचणीत आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैशाख पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश राहत असल्याने यादिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ वन्यजीवांची गणना केली जाते. मात्र पाणवठेच आटल्याने वन्यजीव पाणवठ्यांकडे फिरकणार नाही. परिणामी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारी गणना अडचणीत आली आहे.
मोहफुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात जंगलांना आगी लागण्यास सुरुवात होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गवत सुकले होते. परिणामी जंगलांना लागणाऱ्या आगीमध्ये वाढ झाली आहे. जंगलातील पाणवठे आटल्यानंतर वन्यजीव गावाजवळच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. मात्र यावर्षी तलावातील पूर्ण पाणी शेतीसाठी वापरल्या गेल्याने बहुतांश तलाव कोरडे पडले आहेत. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ मचान लावून पशु गणना केली जाते. मात्र पाणवठ्यांमध्ये पाणीच नसल्याने वन्यजीव तलावाकडे येणार नाही. त्यामुळे वन्यजीवांची गणना कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
जंगलाची तोड थांबावी, यासाठी वन विभागाने नागरिकांना सिलिंडर गॅसचे वाटप केले आहे. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम झाला असल्याचे दिसून येत नाही. ज्या नागरिकांकडे गॅस आहे, ते नागरिक सुद्धा अजूनही जंगलातील सरपण आणून चुलीवर स्वयंपाक करीत असल्याने जंगलाची तोड थांबली नाही. पाणवठे आटल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात फिरत आहेत. त्यामुळे त्यांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ फेब्रुवारी रोजी वैरागडजवळील तलावात वन्यजीवाची शिकार करण्यासाठी विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. यामध्ये एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला. त्यानंतरही वन विभाग फारसा गंभीर झाला नसल्याने वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण सुरूच आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.