सक्रांतीनिमित्त दररोज २५ लाखांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:24+5:30
मकरसंक्रांतीचा सण तीळगुळ व वाणासाठी ओळखला जातो. शहरी व ग्रामीण भागातही हा सण तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे महिलांच्या आनंद व उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येते. गडचिरोली येथील त्रिमूर्ती चौकाच्या मार्गावरील बाजारपेठेत विविध प्रकारच्या वाणांसह, तीळ, गुळ आदींची दुकाने सजलेली आहेत. याशिवाय चंद्रपूर मार्ग व फुटपाथवरही अनेकांनी सणानिमित्त विविध साहित्यांची दुकाने लावली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मकरसंक्रांतीचा सणानिमित्त सध्या गडचिरोलीची बाजारपेठ महिलांच्या गर्दीचे चांगलीच गजबजून गेली आहे. महिलांना वाटप करण्यासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या वाणांसह विविध साहित्य, कपडे आणि दागिन्यांच्या विक्रीला एकच उधान आले. त्यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गडचिरोलीच्या बाजारपेठेत दररोज संक्रांतीच्या खरेदीने २५ ते ३० लाखांची उलाढाल होत आहे.
मकरसंक्रांतीचा सण तीळगुळ व वाणासाठी ओळखला जातो. शहरी व ग्रामीण भागातही हा सण तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे महिलांच्या आनंद व उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येते. गडचिरोली येथील त्रिमूर्ती चौकाच्या मार्गावरील बाजारपेठेत विविध प्रकारच्या वाणांसह, तीळ, गुळ आदींची दुकाने सजलेली आहेत. याशिवाय चंद्रपूर मार्ग व फुटपाथवरही अनेकांनी सणानिमित्त विविध साहित्यांची दुकाने लावली आहेत. तीळ संक्रांतीनिमित्त तीळ, गुळ, वाण, कपडे, सौंदर्य प्रसाधने तसेच किराणा साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला असला तरी महिलांकडून विविध प्रकारचे दागिने तयार करून घेणे तसेच नवीन खरेदी करण्यावरही भर दिला जात आहे.
यावर्षी मकरसंक्रांतीच्या वाणाला महागाईची झळ बसली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाणाच्या किमती ५ ते ७ टक्क्यांनी वाढल्या आहे. तरी सुद्धा महिलांकडून वाण खरेदीचे प्रमाण कमी झाले नाही. वाण व तीळगुळ वाटून एकमेकांमध्ये स्नेह, सलोखा निर्माण करण्याचा व टिकवून ठेवण्याचा संदेश दिला जातो. मकरसंक्रांतीनिमित्त वॉर्डावॉर्डात तसेच समाज संघटनांच्या वतीने स्नेहमिलन मेळावे आयोजित केले जात आहेत. यातून सामाजिक एकतेसह समाजसंघटनही वाढत आहे. शिवाय महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन होत आहे.
दागिने व सौंदर्यप्रसाधने खरेदीवर भर
मकरसंक्रांत म्हटले की, हळदीकुंकवाच्या निमित्ताने एकमेकांना भेटण्याचा चांगला योग असतो. यानिमित्ताने महिला घराबाहेर पडतात. नातेवाईक, मैत्रिणी व कौटुंबिक संबंध असलेल्या महिलांच्या घरी जाऊन वाण स्वीकारले जाते व वाटले जाते. यामुळे सौंदर्य प्रसाधनांसह महिला आपापल्या क्षमतेप्रमाणे नवीन दागिने खरेदी करण्यावर भर देत आहे. काहींनी जुने दागिने मोडून नवीन दागिने तयार करून घेतले आहे. परिणामी सराफा बाजारातही महिलांची गर्दी दिसून येत आहे.
स्टिलच्या वाणांमुळे वाढला बोजा
पूर्वी ग्रामीण व शहरी भागात प्लास्टिकच्या वाणाची क्रेझ होती. त्यामुळे बाजारपेठेतही या वाणाची मागणी होती. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्लास्टिकच्या वाणाची पद्धत जवळजवळ बंद झाली आहे. ग्रामीण भागात काही मोजक्या गावात प्लास्टिकचे वाण आजही वितरित केले जाते. मात्र शहरात प्लास्टिकच्या वाणांची जागा स्टिलच्या वस्तूंनी घेतली आहे. २०० रुपये डझनपासून तर २००० रुपये डझनपर्यंतच्या वस्तू महिला खरेदी करताना दिसतात. त्यामुळे गडचिरोलीची बाजारपेठ स्टिलच्या वाणांनी सजल्याचे दिसून येते. अजून आठवडाभर ही वर्दळ कायम राहण्याची शक्यता आहे.
रोपटे वाटपातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
वैज्ञानिक व आधुनिकदृष्टी असलेल्या काही महिला स्टिल वा प्लास्टिकचे वाण महिलांना वितरित करण्याऐवजी आवश्यक असलेली दुसरी वस्तू वाटण्यावर भर देत आहे. शहराच्या स्नेहनगर व काही भागात काही महिला वाण म्हणून रोपट्याचे वितरण करीत आहेत. यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे. काही मोजक्या महिला वाणाच्या रूपात पुस्तकाचे वाटप करीत असल्याचे दिसून येत आहे.