विसोरा परिसरातील तलाव तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:26 AM2018-08-23T01:26:23+5:302018-08-23T01:27:13+5:30
देसाईगंज तालुक्यातील विसोरा, शंकरपूर, कसारी, डोंगरमेंढा भागात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील तलाव, बोड्या तुडूंब भरल्या आहेत. त्याआधी १५-२० दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने संकटात आलेल्या धानपीकाला नवसंजीवनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरा, शंकरपूर, कसारी, डोंगरमेंढा भागात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील तलाव, बोड्या तुडूंब भरल्या आहेत. त्याआधी १५-२० दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने संकटात आलेल्या धानपीकाला नवसंजीवनी दिली आहे.
विसोरा, शंकरपूर, कसारी गावांसह परिसरात आलेल्या पावसाच्या दमदार सरींनी धानाला चांगलीच उभारी मिळाली आहे. एकाएकी डोळ्यांना न दिसणारा, खूपच बारीक रेषेसमान असा जोर नसलेला, जमीन सुद्धा ओली न करणारा पाऊस गेल्या आठवड्याभरापूर्वी सुरू होता.
जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून गेलेला पाऊस काल-परवापर्यंत जोर धरून पडत नव्हता. त्यामुळे धानपिकाचे काय होणार? या विचारात शेतकरी गुंतून गेला होता. रोवणी होऊन आता महिनाभराचा कालावधी झालेला असल्याने वर्तमान स्थितीत जोरदार पावसाची गरज होती. हवा तसा जोरदार पाऊस पडल्याने धानाच्या वाढीवर अनुकूल प्रभाव पडणार हे निश्चित. तरी बहुतेक काही क्षेत्रातील धानपिकाला अळी लागली आहे. त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर पडणार अशी माहिती आहे.
जुलैच्या २० तारखेला गाढव वाहनावरील पुष्य नक्षत्रात आलेला पाऊस गाढवासमान आळशी होऊन चक्क गायब झाला आणि २ आॅगस्टला संपला. आॅगस्ट ३ तारखेला घोड्यावर बसून आलेला आश्लेषा नक्षत्र घोड्याच्या धावेसारखा सुसाट येणार अशी आशा असतांना अखेर संपण्याच्या एक दिवसापूर्वी मुसळधार कोसळला. १६ आॅगस्टला आश्लेषा नक्षत्र संपला.
१७ आॅगस्टपासून उंदीर वाहनाचा मेघा नक्षत्र सुरू झाला आहे. महिनाभरापूर्वी रजेवर गेलेल्या पावसाने परिसरातील जलसाठे शंभर टक्के भरणार की नाही याबाबत शंका निर्माण केली होती. परंतु २० आॅगस्टला पाऊस दमदार बरसल्याने विसोरा, शंकरपूर, कसारी येथील तलाव, बोड्या, नाले, रस्त्याकडेला असलेले खड्डे यांमध्ये पाणीच पाणी भरले आहे. पुन्हा १५ दिवसांनंतर पावसाची गरज भासणार आहे.