दारूसह १२ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: January 1, 2017 01:31 AM2017-01-01T01:31:08+5:302017-01-01T01:31:08+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आरमोरी तालुक्यातील अरसोडा फाट्याजवळ दारू
वाहन घेतले ताब्यात : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गडचिरोली : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आरमोरी तालुक्यातील अरसोडा फाट्याजवळ दारू व वाहनासह १२ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई ३० डिसेंबर रोजी करण्यात आली.
ब्रह्मपुरी मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दारू आणली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावर पाळत ठेवण्यात आली होती. ३० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एमएच ३६ एफ २१२९ क्रमांकाचे वाहन ब्रह्मपुरी मार्गाने आरमोरीकडे येत असताना दिसून आले. सदर वाहनासह आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दित वैनगंगा नदीजवळ अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने वाहन न थांबविता आरमोरी मार्गाने वाहन सुसाट पळविले. सदर वाहनाचा पाठलाग केला असता, वाहन अरसोडा फाट्याजवळ थांबवून चालक फरार झाला. वाहनात देशी दारूच्या ९० मिलीच्या १२० पेट्या दारू आढळून आली. त्याचबरोबर वाहनही जप्त केले. दारू व वाहनाची किमत १२ लाख ५० हजार रूपये एवढी होते. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे टी. बी. शेख, जी. पी. गजभिये, एस. एम. गव्हारे, व्ही. पी. शेंद्रे, व्ही. पी. महाकूलकर यांच्या पथकाने केली. (नगर प्रतिनिधी)