वाहनासह साडेदहा लाखांचा दारूसाठा जप्त
By admin | Published: April 23, 2017 01:28 AM2017-04-23T01:28:49+5:302017-04-23T01:28:49+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली व कसनसूर पोलिसांनी धाड टाकून चारचाकी वाहनासह
एसडीपीओंचे पथक : रेगडीगट्टा व पारडी फाट्यावर कारवाई
गडचिरोली : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली व कसनसूर पोलिसांनी धाड टाकून चारचाकी वाहनासह एकूण १० लाख ८२ हजार रूपयांचा दारूसाठा जप्त केल्याची कारवाई दोन दिवसात केली. गडचिरोलीच्या एसडीपीओ पथकाने शनिवारी तर कसनसूर पोलिसांनी रेगडीगट्टा येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली.
गडचिरोली एसडीपीओ कार्यालयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना व्याहाड येथील दोन इसम चारचाकी वाहनाने गडचिरोली शहरात देशी दारूची आयात करून त्याचा पुरवठा चिल्लर दारूविक्रेत्यांना करणार आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एसडीपीओ पथकाच्या कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर मार्गावरील पारडी फाट्यावर सापळा रचला. दरम्यान एमएच-३४-के-५५५५ क्रमांकाची मारोती सुझुकी चारचाकी वाहन येताना दिसले. या वाहनाला अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये १ लाख ८ हजार रूपये किंमतीचा दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी या वाहनातून देशी दारूचे १६ खोके जप्त केले. यामध्ये १ हजार ६०० निपा होत्या. याप्रकरणी महेश रवींद्र गड्डमवार (२२), विशाल कवडू कवाडकर (२१) दोघेही रा. व्याहाड ता. सावली जि. चंद्रपूर यांचेवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसडीपीओ कार्यालयाचे पोलीस हवालदार गणेश पवार करीत आहेत.
एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कसनसूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विष्णू वाडकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह रेगडीगट्टा येथे धाड टाकून ८ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दारूविक्रेत्यांच्या घरून गोल्डन गोवा विस्कीच्या एकूण १७० पेट्या दारू जप्त करण्यात आली. सदर दारू तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज मुजूमदार व कृष्णा मुजूमदार हे दोघेजण फरार आहेत. त्यांच्यावर कसनसूर उपपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.