बामणीत २४ जोडपे अडकले लग्नाच्या बेडीत
By admin | Published: March 10, 2016 01:58 AM2016-03-10T01:58:44+5:302016-03-10T01:58:44+5:30
पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला.
५० गॅसचे वाटप : पाच लाखांच्या निधीतून अनेकांना दिला लाभ
बामणी : पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात २४ जोडप्यांचा सामूहिक विवाह लावण्यात आला. तसेच शासनाच्या विविध विभागातर्फे पाच लाखांच्या निधीतून विविध साहित्याचे वाटप परिसरातील नागरिकांना करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन अहेरी आदिवासी विकास प्रकल्पाचे वरिष्ठ आदिवासी निरीक्षक मट्टामी यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामणी उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून बामणीचे वनपाल विशाल सालकर, पोलीस उपनिरीक्षक भोंगाडे, बांधकाम विभाग सिरोंचाचे कार्यकारी अभियंता एन. एम. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गायकवाड, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक खोब्रागडे आदींसह सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विवाहबद्ध झालेल्या २४ जोडप्यांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा धनादेश प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच वन विभागामार्फत ५० एलपीजी गॅस कनेक्शन व ३५ वॉटर फिल्टर नागरिकांना वितरित करण्यात आले. व्हॉलिबॉल स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या संघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या मेळाव्याला ७०० नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक उमेश भोंगाडे, संचालन संदीप टोंगलवार तर आभार विनोद गेडाम, नईम शेख यांनी मानले. (वार्ताहर)