आरमोरीत २४ तासांत दोन अपघात, तीन ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 01:36 PM2023-08-19T13:36:50+5:302023-08-19T13:40:30+5:30
गाय हाकलण्यास गेलेल्या पानटपरी चालकास जोराची धडक: दुचाकी झाडावर धडकल्याने दोघांनी गमावले प्राण
आरमोरी (गडचिरोली): येथे २४ तासांत दोन वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार झाले. शहरातील बर्डी येथे गाय हाकलण्यास गेलेल्या पानटपरी चालकास भरधाव दुचाकीने धडक दिली, यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातातगडचिरोली रोडवर झाडावर दुचाकी आदळून दोन मित्रांनी आपले प्राण गमावले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरमोरीतील बर्डी येथे संतोष प्रभाकर रामपूरकर (४७) यांचे घर आहे. या घरामध्येच त्यांची पानटपरी आहे. १६ ऑगस्टला रात्री दहा वाजता ब्रह्मपुरीहून आरमोरीकडे येणाऱ्या दुचाकीने (एमएच ३६ वाय- ३५९२) त्यांना पानटपरीसमोर जोराची धडक दिली, यात ते गंभीर जखमी झाले, तर दुचाकीवरील किशोर विजय मताने (वय २६, रा.एटापल्ली) व विजय देवराव गावडे(२७, रा.धानोरा) हेही रस्त्यावर आदळल्याने डोक्याला दुखापत झाली. या दोघांवर आरमोरी रुग्णालयात उपचार सुरू असून, संतोष रामपूरकर यांच्यावर ब्रह्मपुरी येथे उपचार सुरू असताना, १८ ऑगस्टला सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
दुसरा अपघात आरमोरी-गडचिरोली रोडवरील एका लॉन्ससमोर १७ ऑगस्टला रात्री दहा वाजता झाला. भरधाव दुचाकी (एमएच ३३ झेड-८५३३) लॉनजवळ झाडावर आदळली. यात सोमदल शामराव खांडकुरे (वय २८, रा.इंजेवारी ता.आरमोरी) व सुनील नामदेव बनपूरकर (वय ५०, रा.देऊळगाव, ता.आरमोरी) हे दोघे ठार झाले. ते दोघे देऊळगाव येथून आरमोरीकडे जात होते, ताबा सुटल्याने दुचाकी झाडावर आदळल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
वडिलांना आराम करा म्हटले अन् अर्ध्या तासातच...
आरमोरीतील बर्डी भागात झालेल्या अपघातातील मयत संतोष रामपूरकर (४७) हे रात्री साडेनऊ वाजता घरातून पानटपरीत आले. वडील प्रभाकर यांना तुम्ही आराम करा, असे म्हणून घरी पाठविले व स्वत: पानटपरीत बसले. अर्ध्या तासानंतर पानपटरीसमोर फिरस्ती गाय आली. तिला हाकलण्यासाठी ते पानटपरीतून बाहेर आले. याच वेळी ब्रह्मपुरीहून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.