बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:12 PM2018-01-27T23:12:32+5:302018-01-27T23:12:49+5:30
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन विद्यार्थी सकाळी ध्वजारोहणासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला एसटी बसची धडक बसली.
आॅनलाईन लोकमत
मुलचेरा : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन विद्यार्थी सकाळी ध्वजारोहणासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला एसटी बसची धडक बसली. यात एकाचा जागीच तर दुसºयाचा मुलचेरा ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाला.
अतुल सिडाम (२३) रा.मल्लेरा व अशोक कुसनाके (२७) रा.मल्लेरा अशी मृतांची नावे आहेत. ते दुचाकी क्रमांक एमएच-३३-एल-३३१७ ने मित्राला घेण्यासाठी सुंदरनगर येथे जात होते. त्यानंतर ते मुलेचरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तिघे मिळून जाणार होते. दरम्यान सुंदरनगर येथे जात असताना भवानीपूर ते श्रीनगर गावाच्या दरम्यान एमएच-०६-एस-८८७२ या बसची दुचाकीला समोरासमोर जबर धडक बसली. या अपघातात अतुलचा जागीच मृत्यू झाला. तर अशोकचा ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकली. बसचे ब्रेक फेल झाल्याची माहिती चालकाने प्रवाशांना दिली. अपघात झाल्यानंतर वाहक व चालकांनी बस जागीच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
घटनास्थळ मुलचेरापासून केवळ आठ किमी अंतरावर असल्याने अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.