दोन लाखांच्या दारूसह वाहतूक करणारी कार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:21+5:30
प्राप्त माहितीनुसार, एका आकाशी रंगाच्या कारमधून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती शनिवारी (दि.७) सायंकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवन, देसाईगंजचे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, उपनिरीक्षक हर्षल नगरकर यांनी आरमोरी मार्गावरील निरंकारी भवनाजवळ सापळा रचला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कारमधून २ लाख रुपयांची दारू अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना देसाईंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील कारसह २ लाख १० हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही दारू लाखांदूरमार्गे आरमोरीकडे जाताना देसाईगंजजवळ ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, एका आकाशी रंगाच्या कारमधून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती शनिवारी (दि.७) सायंकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवन, देसाईगंजचे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, उपनिरीक्षक हर्षल नगरकर यांनी आरमोरी मार्गावरील निरंकारी भवनाजवळ सापळा रचला. नायक विजय नंदेश्वर, गुरूदेव चौधरी, संतोष नागरे, रुपाली बावनकर व चालक शंकर बंडे हे पाळत ठेवून असताना एमएच ४३, व्ही ९१२७ हे वाहन आरमोरीकडे जाताना दिसले. त्या वाहनास थांबवून तपासले असता देशी दारूच्या ३५०० प्लास्टिक सिलबंद बाटल्या सापडल्या. ही २ लाख १० रुपयांची दारू आणि ३ लाख किमतीची कार असा ५ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही दारू नागपूरवरून आली असून ती चंद्रपूरकडे जात असल्याचे देसाईगंज पोलिसांनी सांगितले. यातील आरोपी संदीप रामू हेडाऊ, रा.धांदला, जि.नागपूर आणि राजेश गणेश रायकवार, रा.कामाक्षीनगर, नागपूर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.