वादळाने गोठा कोसळून दोन जनावरे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:20 AM2018-05-25T01:20:46+5:302018-05-25T01:20:46+5:30
चामोर्शी तालुक्यातील गणपूर परिसरातील मुधोली तुकूम येथील रहिवासी गंगाराम पोचू झाडे यांच्या मालकीचा गुरांचा गोठा कोसळून दोन जनावरे जखमी झाली. तर पाच जनावरे सुखरूप निघाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील गणपूर परिसरातील मुधोली तुकूम येथील रहिवासी गंगाराम पोचू झाडे यांच्या मालकीचा गुरांचा गोठा कोसळून दोन जनावरे जखमी झाली. तर पाच जनावरे सुखरूप निघाली.
गणपूर परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस झाला. वादळामुळे गजानन झाडे यांचा गुरांचा गोठा कोसळला. या गोठ्यात एकूण सात जनावरे होती. त्यापैकी पाच जनावरे सुखरूप निघाली. मात्र दोन जनावरे गोठ्यातच सापडल्याने जखमी झाली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोठ्यात सापडलेली जनावरे काढण्यास मदत केली. यावेळी स्थानिक रहिवासी साईनाथ झाडे, उपसरपंच सुनील कडते, नामदेव वळुले, रितेश आसमवार, मारोती झाडे, मारोती नागापुरे, चंदू तिमाडे, बाबुराव नागापुरे, गणपती तिमाडे, दिवाकर झाडे यांनीही मदत केली.
आ. डॉ. देवराव होळी यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कोसळलेल्या गोठ्याची पाहणी केली. शेतकरी गजानन झाडे यांची विचारपूस केली. मागील आठ दिवसांपासून गणपूर परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फटका परिसरातील अनेक घरांना बसला आहे. शेकडो घरांवरील कवेलू उडून गेल्याने नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यात आले असून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.