आॅनलाईन नामांकनाला दोन दिवस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:56 AM2018-02-11T00:56:57+5:302018-02-11T00:58:53+5:30
जिल्ह्यात होऊन घातलेल्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्ह्यात होऊन घातलेल्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली. त्यामुळे दि.१२ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत आॅनलाईन नामांकन स्वीकारले जाणार आहेत. याशिवाय मतदान २५ ऐवजी २७ फेब्रुवारीला होणार आहे.
आॅनलाईन नामांकन दाखल करताना ग्रामीण भागात येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन निवडणूक आयोगाने हा बदल केला आहे. दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने हा मुद्दा प्रकर्षाने मांडून अनेक इच्छुक उमेदवारांवर निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते हे निदर्शनास आणले होते हे विशेष.
सुधारित कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.१४ ला सकाळी ११ वाजतापासून होणार आहे. त्यानंतर नामांकन मागे घेण्यासाठी दि.१६ ला दुपारी ३ पर्यंतची वेळ दिली आहे. मतदान दि.२७ ला सकाळी ७.३० पासून दुपारी ३ वाजेपर्यंत करता येणार आहे. दि. मतमोजणी दि.२८ ला संबंधित तालुका मुख्यालयी होईल.
जिल्ह्यात पोटनिवडणूक होत असलेल्या २०७ ग्रामपंचायतींमध्ये सदस्या व सरपंचांची ५१९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असले तरी आॅनलाईन नामांकन दाखल करण्यासाठी ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नाही. तालुकास्थळीही इंटरनेटची गती अतिशय मंद राहात आहे. त्यामुळे नामांकन दाखल करणे अडचणीचे जात आहे. तब्बल साडेपाचशे पेक्षा जास्त पदांसाठी ही निवडणूक असताना पाच दिवसात केवल ८२ उमेदवारांचे नामांकन निवडणूक विभागाच्या पोर्टलवर आले होते. यावरून स्थितीची कल्पना येते.
राखीव जागेसाठी नामांकन भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात आल्याने उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही इंटरनेट समस्येचा खोळंबा कायम आहे.