‘त्या’ दोन तोतया नक्षलवाद्यांना दोन दिवसांचा पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2017 01:08 AM2017-06-09T01:08:59+5:302017-06-09T01:08:59+5:30
धानोरा तालुक्यातील येरकड पोलीस मदत केंद्राच्या हद्दित येणाऱ्या जपतलाई या गावातून ग्रामस्थांकडून
जपतलाई येथील प्रकार : तेंदू संकलनाचे मागितले पैसे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील येरकड पोलीस मदत केंद्राच्या हद्दित येणाऱ्या जपतलाई या गावातून ग्रामस्थांकडून नक्षल्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या ‘त्या’ दोन तोतया नक्षलवाद्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भिसारू गोटा व साहेबराव कुजूर असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या तोतया नक्षलवाद्यांचे नाव आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भिसारू गोटा व साहेबराव कुजूर हे दोघे जण मंगळवारी जपतलाई गावात गेले. तेथे किशोर बाबुराव हलामी हे तेंदू संकलनाच्या मजुरीचे पैसे लोकांना वाटत होते. दरम्यान किशोर हलामी यांच्याजवळ जाऊन या दोन तोतया नक्षलवाद्यांनी ‘आम्हाला नक्षलवाद्यांनी पाठविले आहेत. वाटप करीत असलेल्या तेंदू संकलनाच्या पैशातून १० हजार रूपये दे, नाही तर तुला याच ठिकाणी जीवानिशी मारून टाकू’, अशी धमकी हलामी यांना दिली. यावर सदर पैसे हे लोकांचे असल्याने ते तुम्हाला द्यावयाचे की नाही याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून उद्या सकाळी सांगतो, असे हलामी यांनी तोतया नक्षलवाद्यांना सांगितले. तेंदू संकलनाच्या मजुरीचे पैसे हे कष्टाचे असल्याने त्यांना न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. दुसऱ्या दिवशी बुधवारला ग्रामस्थांनी या दोन तोतया नक्षलवाद्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी या दोघांवर धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास येरकड पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक किरण वराळ करीत आहेत.
यापूर्वीही नक्षल्यांना पुरविण्यात येणारी रसद पोलिसांनी पकडली होती. सदर रक्कम ही तेंदू संकलन करणाऱ्या मजुराच्या मजुरीची होती. खंडणीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात वाढले असल्याचे दिसून येते.