तीन दिवसात आष्टीच्या स्टेट बँकेत दोन करोड जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 01:56 AM2016-11-13T01:56:36+5:302016-11-13T01:56:36+5:30
येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत १० नोव्हेंबरला १ कोटी ५ लाख व ११ नोव्हेंबरला ५६ लाख
एक तासात एटीएममधून अडीच लाखांची रक्कम संपली
आष्टी : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत १० नोव्हेंबरला १ कोटी ५ लाख व ११ नोव्हेंबरला ५६ लाख व १२ नोव्हेंबरला ६० लाख रूपये विविध ग्राहकांकडून जमा करण्यात आले. तीन दिवसांमध्ये जवळपास दोन करोड रूपये जमा झाले आहेत.
५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी दोन काऊंटर उघडण्यात आले आहे. सोबतच १० हजार रूपयांचा विड्रॉलही देणे सुरू आहे. शनिवारी सकाळी एटीएममध्ये २ लाख ५० हजार रूपये टाकण्यात आले होते. परंतु एका तासामध्ये एटीएममधील रक्कम संपली. बँकेत कॅश उपलब्ध आहे. परंतु कर्मचारी नसल्याने एटीएममध्ये पैसे टाकण्यास विलंब झाला. त्यामुळे नागरिक एटीएम सुरू होण्याची वाट पाहत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकेत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. आष्टी येथील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतही शनिवारी सकाळपासूनच ५०० व १००० च्या नोटा जमा करण्यासाठी गर्दी झाली होती. दोन दिवसात सहकारी बँकेच्या आष्टी येथील शाखेत ६० लाख रूपये जमा करण्यात आले. शनिवारी ३५ लाख रूपये जमा झाले. येथेही दोन काऊंटर पैसे जमा करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. बँकेतून दोन हजार रूपये विड्रॉल देणे सुरू आहे. येथील एटीएम ११ नोव्हेंबरपासून सुरू करायचे होते. परंतु मुख्य शाखेतून पैसे उपलब्ध न झाल्याने एटीएम शनिवारी बंदच होते, अशी माहिती शाखा अधिकारी दुर्गे यांनी दिली. (प्रतिनिधी)