गडचिरोलीत २० लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी जोडप्याचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 03:10 PM2022-03-16T15:10:49+5:302022-03-16T16:02:52+5:30
२० लाख रुपये बक्षीस असलेल्या एका जहाल नक्षल दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.
गडचिरोली : नक्षली हिंसाचाराला कंटाळून आणि शासनाच्या आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी असलेल्या पुनर्वसन योजनेला प्रतिसाद देत एका नक्षली दाम्पत्याने बुधवारी (दि.१६) गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या दोघांवर मिळून २० लाख रुपयांचे बक्षीस होते.
दिपक ऊर्फ मुन्शी रामसु ईष्टाम (वय ३४, रा. गडेरी, पोमके कोटमी ता. एटापल्ली जि. गडचिरोली) व शामबत्ती नेवरु आलाम (वय २५, रा. हिदवाडा पो. ओरछा जि. नारायणपुर (छ.ग.)) यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. दिपक ईष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती-पत्नी असून ते दोघेही प्लाटुन क्र. २१ मध्ये कार्यरत होते. दिपक हा डीव्हिसी पदावर तर शामबत्ती ही प्लाटुन सदस्य म्हणून कार्यरत होती.
दोघांवर विविध गुन्हे दाखल
दिपक ईष्टाम याच्यावर खूनाचे ३, चकमकीचे ८, जाळपोळ २ असे गुन्हे दाखल असून, पत्नी शामबत्तीवर चकमकीचे २ गुन्हे दाखल आहेत. शासनाने दिपक ईष्टामवर १६ लाख तर शामबत्ती आलामवर ४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
सन २०१९ ते २०२२ पर्यंत ४५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
सन २०१९ ते २०२२ सालामध्ये ४५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ५ डिव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर, ३४ सदस्य व १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर २ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालींवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.
आतापर्यंत ६४९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून एकुण १४४ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना भूखंड वाटप, ११७ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना घरकुल वाटप, ६४३ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना आधारकार्ड वाटप, ३६ महिला आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शिलाई मशिनचे वाटप, २३ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शेळी पालन व इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्यामुळे आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढत असून ते लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात सामिल होऊन सन्मानाने जीवन जगत आहेत.
विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.