नक्षलवाद्यांची वनरक्षकांना बेदम मारहाण, गट्टा वनपरिक्षेत्रातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 05:47 PM2022-01-12T17:47:30+5:302022-01-12T17:54:36+5:30
एटापल्ली तालुक्यातील गट्टा वनपरीश्रेत्रातील दोन वनरक्षकांना नक्षल्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तांतर्गत येत असलेल्या भामरागड वनविभागातील दोन वनरक्षकांना गावालगतच्या जंगल परिसरात नेऊन नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे.
हुकेश आर. राऊत, वनरक्षक विसामुंडी व जागेश्वर एम. चुरगाये, वनरक्षक नारगुंडा अशी जखमींची नावे आहेत. ते दोघेही मंगळवारी (दि. ११) सकाळी आलेंगा उपक्षेत्रातील नियतक्षेत्र विसामुंडी येथे वनतलावाच्या जागेची पाहणी करण्याकरता गेले होते. यानंतर, गावकऱ्यांसोबत चर्चा करून दुचाकीने परतताना विसामुंडी नाल्याजवळ नक्षल्यांनी त्यांना अडवले. व तुम्ही कोण, या रस्त्याने कसे आले? असे विविध प्रश्न विचारत जंगलात नेऊन झाडाला बांधले व बेदम मारहाण केली.
नक्षलवाद्यांनी त्यांच्या जवळील साहित्यही हिसकावून घेतले असे वनरक्षकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.