जहाल नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण; १२ लाख रुपयांचे हाेते बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 12:09 PM2022-05-13T12:09:58+5:302022-05-13T12:10:36+5:30
लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच नक्षलवद्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.
गडचिराेली : नक्षल चळवळीला कंटाळून दाेन जहाल नक्षल दाम्पत्याने गडचिराेली पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला माेठा धक्का बसला आहे. या दाेघांवरही सुमारे १२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले हाेते.
कोलू ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा (वय २७ रा. वक्कुर, पोस्टे कोयलीबेडा, ता. आरेच्छा जि. नारायणपूर (छ.ग.) व राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी (वय ३०, रा. जवेली (बु.) ता. एटापल्ली जि. गडचिरोली, अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दाम्पत्याची नावे आहेत. कोलू पदा याचेवर आठ लाख रुपयांचे, तर राजे उसेंडी हिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
कोलू पदा हा सप्टेंबर २०१० मध्ये प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. त्याच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. त्याने लावलेल्या ॲम्बुशमध्ये २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पाेलीस मदत केंद्र कोठी हद्दीतील पोयारकोठी जंगल परिसरात एक पोलीस अधिकारी व एक पोलीस जवान शहीद झाले होते. राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी फेब्रुवारी २०११ मध्ये कसनसूर दलम सदस्य पदावर भरती झाली होती. राजे उसेंडी हिचेवर ६ गुन्हे दाखल आहेत. सन २०१९ मध्ये मौजा मुसपर्शी येथील साईनाथ तव्वे या इसमाच्या खुनात तिचा सहभाग होता.
लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच नक्षलवद्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.
या कारणांमुळे केले आत्मसमर्पण
- नक्षल दलममध्ये वरिष्ठ माओवाद्यांकडून महिला व मुले यांना वाईट वागणूक दिली जाते. जंगलामध्ये असंख्य मैलाचा प्रवास पायी करावा लागतो. नक्षलवाद्यांना जनतेचा पाठिंबा मिळणे बंद झाले आहे. दलममध्ये नसबंदी करून पती-पत्नीला इतर दलममध्ये वेगवेगळे ठेवले जाते. पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे. त्यामुळे आत्मसमर्पण करीत असल्याचे सांगितले.
- आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता शासनाकडून कोलू पदा यास ३.५ लाख रुपये, तर राजे उसेंडी हिला २.५ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. दाेघांनीही एकत्रित आत्मसमर्पण केल्याने अतिरिक्त १.५ लाख रुपये असे एकूण ७.५ लाख रुपये मदत त्यांना दिली जाणार आहे.