भिवापूर येथे दोन तास चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:48 AM2017-09-07T00:48:23+5:302017-09-07T00:48:46+5:30

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत वेळेवर जाता यावे, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत एसटी महामंडळाच्या माध्यमातून शाळाप्रमुखांसोबत समन्वय साधून त्या-त्या मार्गावर बसेसची व्यवस्था करायला हवी होती.

Two-hour clash at Bhivapur | भिवापूर येथे दोन तास चक्काजाम

भिवापूर येथे दोन तास चक्काजाम

Next
ठळक मुद्देविद्यार्थी व ग्रामस्थांचा बससमोर ठिय्या : चामोर्शी-मक्केपल्ली मार्गावर जादा बसगाड्या सोडा

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत वेळेवर जाता यावे, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत एसटी महामंडळाच्या माध्यमातून शाळाप्रमुखांसोबत समन्वय साधून त्या-त्या मार्गावर बसेसची व्यवस्था करायला हवी होती. मात्र परिवहन महामंडळाच्या नियोजन शून्यतेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चामोर्शी-मक्केपल्ली मार्गावरील विद्यार्थ्यांची बसेसअभावी मोठी गैरसोय होत असून मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर मार्गावर जादा बसगाड्या सोडण्यात याव्या, या मागणीसाठी चामोर्शी पं. स. चे माजी उपसभापती केशव भांडेकर यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चामोर्शी-मक्केपल्ली मार्गावरील भिवापूर येथील बसस्थानकावर बसगाडीला रोखून तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी महामंडळाच्या गडचिरोली आगारप्रमुखांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांसाठी अधिक बसगाड्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. मात्र आगारप्रमुखांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर चामोर्शी पं. स. चे माजी उपसभापती केशव भांडेकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थी व ग्रामस्थांनी भिवापूर बसस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले.
चामोर्शी-मक्केपल्ली मार्गावरील आमगाव, रेखेगाव, भाडभिडी, अनंतपूर, हळदवाही, वालसरा, कुंभारवाई, राजनगट्टा, भिवापूर अशा अनेक गावांमधून दररोज जवळपास ३०० विद्यार्थी चामोर्शी येथे शिक्षण घेण्यासाठी ये-जा करतात. सदर विद्यार्थ्यांसाठी रोज सकाळी मक्केपल्ली येथून येणारी बस वालसरा, भिवापूर येथे जादा प्रवाशी संख्येमुळे थांबत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची समस्या विद्यार्थ्यांनी वालसरा येथील केशव भांडेकर यांना भेटून सांगितले. यावर जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी १ सप्टेंबर रोजी सदर मार्गे धावणारी बस वालसरा येथे विद्यार्थ्यांसाठी थांबविण्यात आली नाही, अशी तक्रार गडचिरोलीच्या आगारप्रमुखांकडे केली. बसगाडी न थांबण्याची पुनर्रावृत्ती ४ सप्टेंबरला झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. चामोर्शीकडे येणारी बस सकाळी ७ वाजता भिवापूर-वालसरा मार्गे सुरू करावी, चामोर्शीवरून तळोधी मार्गे मुरूमुरू-येडानूर बस सुरू करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले व त्यानंतर दूरध्वनीद्वारेही संपर्क साधण्यात आला.
मात्र या गंभीर समस्येकडे आगार व्यवस्थापकाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी माजी पं. स. उपसभापती केशव भांडेकर यांच्या नेतृत्वात भिवापूर बसस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले.

चामोर्शी-मक्केपल्ली मार्गावर विद्यार्थी संख्या अधिक असल्याने दोन बसगाड्यांची आवश्यकता असल्याबाबतचे निवेदन आपल्याला प्राप्त झाले आहे. सदर निवेदन वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहे.
- एस.ए. चौधरी, वाहतूक निरीक्षक, एसटी महामंडळ, चामोर्शी

घोटकडून थेट चामोर्शीकडे येणारी बसगाडी आता घोट वाया आमगाव-भिवापूर मार्गे सोडण्यात येणार आहे.
- दिनेश बावणे, आगार व्यवस्थापक, गडचिरोली, महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळ

Web Title: Two-hour clash at Bhivapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.