छत्तीसगड सीमाभागात चकमक, दोन जहाल नक्षल्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 10:20 AM2022-12-24T10:20:18+5:302022-12-24T10:28:10+5:30

१६ लाखांचे बक्षीस असणाऱ्या महिला नक्षलीचा समावेश

Two Jahal Naxal killed In Gadchiroli on the border of Chhattisgarh | छत्तीसगड सीमाभागात चकमक, दोन जहाल नक्षल्यांना कंठस्नान

छत्तीसगड सीमाभागात चकमक, दोन जहाल नक्षल्यांना कंठस्नान

googlenewsNext

गडचिरोली : जिल्हा पोलिस दलाच्या सी-६० कमांडोंनी छत्तीसगड पोलिसांना सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान नक्षलवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत दोन जहाल नक्षली ठार तर एक जनमिलिशिया सदस्य जखमी झाला. मृतांपैकी महिला नक्षलीची ओळख पटली असून तिच्यावर महाराष्ट्र शासनाने १६ लाख रुपयांचे, तर तेलंगणा सरकारने ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. मृत पुरुष नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

प्राप्त माहितीनुसार, नक्षल्यांचे तेलंगणातील एक दलम सध्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात कार्यरत असून ते महाराष्ट्राच्या हद्दीत घातपाती कारवाया करणार असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सी-६० पथकाच्या ३०० जवानांनी आणि छत्तीसगड पोलिसांच्या जिल्हा राखीव दलाच्या (डीआरजी) २० जवानांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. अहेरी तालुक्यातील दामरंचा उपपोलिस स्टेशनपासून छत्तीसगड राज्याच्या सीमेत १० किलोमीटर अंतरावर टेकामेटा जंगलात सकाळी ऑपरेशन सुरू होते.

सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या २० ते २२ च्या संख्येतील नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले; पण त्याला प्रतिसाद न देता नक्षल्यांनी आणखी गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे ३० ते ४५ मिनिटे चाललेल्या या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला.

सदर अभियान पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

मृत महिला नक्षल नेता भास्करची पत्नी

चकमकीनंतर या जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता एक महिला आणि एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह आढळला. मृत महिला नक्षल्याची ओळख पटली असून ती कांती लिंगय्या ऊर्फ अनिता (४१ वर्षे), रा. लक्ष्मीसागर, जि. निर्मल (तेलंगणा) असल्याचे स्पष्ट झाले. ती सध्या डीव्हीसीएम (इंद्रावेली एरिया कमिटी) या पदावर कार्यरत होती. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने १६ लाखांचे तसेच तेलंगणा शासनाने ५ लाखांचे बक्षीस लावले आहे. नक्षल नेता मैलारापू अडेल्लू ऊर्फ भास्कर (तेलंगणा राज्य समिती सदस्य व सचिव, कुमारम भीम डिव्हिजन कमिटी) याची पत्नी होती. अनोळखी नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय जखमी नक्षल्याचे नाव लचमया कुच्चा बेलादी (२८ वर्षे, रा. टेकामेटा, छत्तीसगड) असे आहे. त्याच्यावर गडचिरोलीत उपचार सुरू आहेत.

दोन एसएलआर रायफलींसह नक्षली साहित्य जप्त

घटनास्थळावर पोलिस जवानांना दोन एसएलआर रायफल, तसेच एक भरमार बंदूक, तसेच मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळले. पोलिस पथकाकडून संध्याकाळपर्यंत जंगलात कोम्बिंग ऑपरेशन सुरूच होते. गडचिरोली पोलिस दल आणि छत्तीसगडच्या बिजापूर पोलिस दलाने पहिल्यांदाच अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियान राबविले आहे.

Web Title: Two Jahal Naxal killed In Gadchiroli on the border of Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.