दोन अपघातात दोघे ठार, नऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:06 AM2018-05-09T00:06:27+5:302018-05-09T00:06:27+5:30
चामोर्शी व धानोरा तालुक्यात मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. चामोर्शी तालुक्यात वाघदरा-जयनगर गावाच्या दरम्यान चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातातील एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा गडचिरोलीला नेताना मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी/धानोरा : चामोर्शी व धानोरा तालुक्यात मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. चामोर्शी तालुक्यात वाघदरा-जयनगर गावाच्या दरम्यान चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातातील एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा गडचिरोलीला नेताना मृत्यू झाला. पेंढरी-गट्टा मार्गावर प्रवासी वाहन उलटल्याने यात आठ प्रवासी जखमी झाले.
निमरड टोला येथील यादव नागोजी शिंदे, मोहन नागोजी शिंदे व रूपेश राऊत हे तिघे जण एमएच ३३ पी ६१८१ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने चामोर्शी तालुक्याच्या गणपूर येथे मंगळवारी लग्नाला गेले होते. सदर लग्नकार्य आटोपून निमरडटोलासाठी बोरी गावाकडून चामोर्शीकडे येत असताना वाघदरा-जयनगर गावाच्या दरम्यान एमएच ३४ एए ५७१७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने या दुचाकीला धडक दिली. यात यादव नागोजी शिंदे (३२) रा. निमरड टोला हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेला मोहन नागोजी शिंदे याला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. मृतक दोघेही सख्खे भाऊ आहेत. तर या अपघातात जखमी झालेला रूपेश राऊत मृतकांचा मेहुणा आहे. चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी चामोर्शी पोलिसांनी कसोसीचे प्रयत्न केले. वाहन चालक धनराज दिगांबर वन्नेवार (३६) रा. रामसागर याला अटक केली. त्याच्या विरूध्द भादंविचे कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, सहकलम १८४, १३४ (अ), १८५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मल्हार थोरात, पोलीस हवालदार दुलाल मंडल व सुनील हजारे करीत आहेत. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने निमरड टोला गावावर शोककळा पसरली आहे.
धानोरा तालुक्याच्या पेंढरी - गट्टा मार्गावर एका प्रवासी वाहनाचा अपघात झाल्याने वाहनातून प्रवास करणारे आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एमएच ३३ ए १२०५ क्रमांकाच्या प्रवासी वाहनामध्ये अचानक बिघाड आला. वाहन भरधाव असताना बिघाड निर्माण झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे वाहन रस्त्यावरच उलटले. यामध्ये प्रवासी जखमी झाले. जखमींना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र अपुºया सोयीअभावी त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.