ट्रक-कारच्या अपघातात दोन ठार
By Admin | Published: December 28, 2015 01:36 AM2015-12-28T01:36:02+5:302015-12-28T01:36:02+5:30
भरधाव ट्रक व कारची समोरासमोर धडक बसल्याने एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला.
पिता-पुत्र गंभीर जखमी : देसाईगंज-लाखांदूर मार्गावरील सावंगीनजीकची घटना
देसाईगंज : भरधाव ट्रक व कारची समोरासमोर धडक बसल्याने एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला. तर या अपघातातील कारमधील दोघे पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना देसाईगंज-लाखांदूर मार्गावर सावंगीनजीक रविवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली.
कांचन राऊत (४१), रा. ब्रह्मपुरी असे जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे तर राजेश माधव उरकुडे (४०) रा. ब्रह्मपुरी यांचा उपचारादरम्यान देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाला. विनायक किसन देवतळे (६५), गोकुळ विनायक देवतळे (३१) रा. चंद्रपूर हे दोघे गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, विनायक देवतळे यांच्यासह चौघे जण एमएच ३४ एएम ३६७७ या कारने लाखांदूर तालुक्यात गोकुलला लग्नासाठी मुलगी बघायला जात होते.
दरम्यान लाखांदूरकडून येणाऱ्या एमएच ३४ एबी १४९१ या भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कारमधील कांचन राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेश उरकुडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या विनायक देवतळे व गोकुल देवतळे या दोघे पिता-पूत्रांना देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
राजेश उरकुडे हे कार चालवित होते. धडक इतकी भीषण होती की, अनियंत्रित ट्रक लगतच्या शेतात २०० फूट अंतरावर पडला. तर कार समोरून प्रचंड क्षतिग्रस्त झाली आहे. या घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)