दोन अपघातात दोघे ठार, एक जखमी

By admin | Published: June 15, 2017 01:17 AM2017-06-15T01:17:36+5:302017-06-15T01:17:36+5:30

गडचिरोली शहर व घोट परिसरातील श्यामनगरनजीक झालेल्या दोन अपघातात दोन इसम ठार झाल्याची घटना बुधवारी घडली.

Two killed, two injured in two accidents | दोन अपघातात दोघे ठार, एक जखमी

दोन अपघातात दोघे ठार, एक जखमी

Next

वाहने क्षतिग्रस्त : गडचिरोलीत कारची दुचाकीला, तर घोट मार्गावर ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/घोट : गडचिरोली शहर व घोट परिसरातील श्यामनगरनजीक झालेल्या दोन अपघातात दोन इसम ठार झाल्याची घटना बुधवारी घडली.
गडचिरोली येथील चंद्रपूर मार्गावर फुटक्या मंदिराजवळ एका भरधाव कारने दुचाकीला दुपारी २.३० ते ३ वाजताच्या सुमारास धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान ठार झाला तर दुचाकीवर मागे असलेले वृद्ध जखमी झाले. घोट मार्गावरील श्यामनगरनजीक सकाळी ११ वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.
रमेश दादाजी दुधे रा. साईनगर, गडचिरोली असे गडचिरोली येथील अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर त्यांच्या सोबत मागे बसलेले सुंदरलाल रामटेके रा. सालेभट्टी ता. मानपूर जि. राजनांदगाव (छत्तीसगड) हे जखमी झाले आहेत. घोट मार्गावरील श्यामनगरनजीक झालेल्या अपघातात रमेश माधव झुरे (४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रमेश दादाजी दुधे (५०) हे त्यांचे नातेवाईक सुंदरलाल हेमाजी रामटेके (६२) यांना घेऊन कॉम्प्लेक्स (नवेगाव) येथून गडचिरोलीच्या मुख्य बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी एमएच-३३-एच-९८५८ क्रमांकाच्या दुचाकीने येत होते. दरम्यान मागून येणाऱ्या एमएच-४०-बीसी-६७८६ क्रमांकाच्या भरधाव कारने धडक दिली. यात दुचाकीस्वार रमेश बुद्धे व सुंदरलाल रामटेके हे दोघेहीजण जखमी झाले. लागलीच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर स्थितीत असलेल्या रमेश दादाजी दुधे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक रमेश दुधे हे आसरअल्ली शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते. तर जखमी झालेले सुंदरलाल रामटेके हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. सदर अपघातातील कार प्रचंड क्षतिग्रस्त झाली आहे. दुचाकीसुद्धा क्षतिग्रस्त झाली. गडचिरोली पोलिसांनी या अपघातातील कारचालक व मालक सुलतान अमी हबीबभाई नाथानी (५९) रा. गडचिरोली यांचेवर भादंवि व मोटार वाहन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कार ताब्यात घेतली आहे. कारचालकाला अटक करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक नैताम करीत आहेत.

अन् रायपुरे कुटुंबीयांचा आनंदोत्सव झाला दु:खात परावर्तित
इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात वियानी विद्यानिकेतन गडचिरोली येथील विद्यार्थिनी नम्रता देवेंद्र रायपुरे हिने ९६.६० टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. नम्रताच्या यशाचा आनंदोत्सव रायपुरे कुटुंबात मंगळवारी सुरू झाला. दरम्यान नम्रता रायपुरे हिचे आजोबा सुंदरलाल रामटेके (रा. छत्तीसगड) हे बुधवारी नातीच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी गडचिरोलीत आले. त्यांच्यासमावेत त्यांचे भाचजावई रमेश दादाजी दुधे रा.गडचिरोली हे सुद्धा नम्रता रायपुरे यांच्या घरी दाखल झाले.
नम्रताची भेट घेतल्यानंतर या दोन्ही नातेवाईकांनी तोंडभरून तिचे कौतुक केले. त्यानंतर नम्रताचे आजोबा सुंदरलाल रामटेके हे नम्रतासाठी एक भेटवस्तू खरेदी करण्यासाठी गडचिरोलीच्या बाजारपेठेत रमेश दुधे यांच्यासोबत दुचाकीने मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी निघाले. पण चंद्रपूर मार्गावरील फुटक्या मंदिराजवळ भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात नम्रताचे आजोबा व तिचे मामा दोघेही जखमी झाले.
उपचारादरम्यान रमेश दुधे यांचा सायंकाळी मृत्यू झाला. या अपघाताने नम्रता रायपुरे हिच्या कुटुंबीयांना दु:खाश्रू अनावर झाले. बुधवारी सकाळपर्यंत रायपुरे कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांमध्ये यशाचा आनंद होता. मात्र दुपारी ३ वाजतादरम्यान झालेल्या या अपघाताने रायपुरे कुटुंबीयांचा आनंद हिरावला. अपघाताची माहिती मिळताच नम्रतासह तिच्या कुटुंबीयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली. नम्रताला भेटवस्तू देण्याआधीच आजोबाला रुग्णालयात दाखल व्हावे लागले.

अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालकाने काढला पळ
घोट येथून जवळच असलेल्या चामोर्शी मार्गावरील श्यामनगर गावानजीक ट्रॅव्हल्स व दुचाकी अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. ट्रॅव्हल्स चामोर्शीवरून घोट मार्गे मुलचेरा येथे जात असताना श्यामनगर येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला समोरून धडक दिली. यामध्ये रमेश माधव झुरे (४०) रा. बेलगट्टा (माल) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एमएच-३३-१०२४ क्रमांकाची खासगी बस (ट्रॅव्हल्स) प्रवाशी घेऊन मुलचेराकडे जात होती. दरम्यान समोरून येणाऱ्या एमएच-३३-पी-०७०२ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेला रमेश माधव झुरे हा गंभीर जखमी झाला. त्याला त्याच ट्रॅव्हल्सने घोट येथील दवाखान्यात आणण्यात आले. परंतु गंभीर जखमी अवस्था बघून त्याला चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याची प्राणज्योत मावळली. ट्रॅव्हल्स चालकाने घोट येथे जखमीला सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच घोट पोलिसांनी वाहनचालक रोशन वाघमारे रा. चंद्रपूर याला व अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये करीत आहेत.

 

Web Title: Two killed, two injured in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.