दोन अपघातात दोघे ठार, तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:06 AM2018-07-14T01:06:01+5:302018-07-14T01:06:25+5:30
आरमोरी-देसाईगंज मार्गावरील कोंढाळा गावाजवळ गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रूग्णवाहिका व कार यांची जबर धडक झाली. या धडकेत आरमोरी येथील दोन शिक्षक गंभीर जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/आरमोरी : आरमोरी-देसाईगंज मार्गावरील कोंढाळा गावाजवळ गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रूग्णवाहिका व कार यांची जबर धडक झाली. या धडकेत आरमोरी येथील दोन शिक्षक गंभीर जखमी झाले. दुसऱ्या अपघातात देऊळगावजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाले.
कोंढाळाजवळील अपघातात प्रा.अशोक जुवारे (४५) व प्राथमिक शिक्षक महेंद्र गुळदे (४३) रा.आरमोरी हे गंभीर जखमी झाले आहेत. एमएच ३३, ए ५२१० क्रमांकाची कार देसाईगंजवरून आरमोरीकडे येत होती तर एमएच ३३ जी १३५५ क्रमांकाची रूग्णवाहिका गडचिरोलीवरून देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथे जात होती. दरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जबर होती की दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला. यामध्ये जुवारे व गुळदे गंभीर जखमी झाले. जुवारे यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. गुळदे यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तत्पूर्वी बुधवारी रात्री ८ वाजता झालेल्या अपघातात आरमोरीवरून गडचिरोलीकडे जाणाºया कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात देऊळगाव येथे घडला.
कृष्णा वासुदेव बुद्धेवार (३८), नीलकंठ मारोती गेडाम (४५) दोघेही रा.देऊळगाव अशी मृतकांची नावे आहेत, तर लतीफ अभिमन्यू निंदेकार (२४) रा.देऊळगाव असे जखमी युवकाचे नाव आहे. लतीफ निंदेकार, कृष्णा बुद्धेवार, नीलकंठ गेडाम हे एमएच-३४-एस-५४ या क्रमांकाच्या दुचाकीने डोंगरसावंगी या गावावरून देऊळगाव येथे येत होते. दरम्यान एमएच-३१-सीएन-७००७ या कारने देऊळगावजळील तलावाजवळ दुचाकीला जबर धडक दिली.
अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. गावकºयांनी जखमी तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती केले. यातील मृतक कृष्णा वासुदेव बुद्धेवार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे नेले जात होते. दरम्यान मार्गातच त्यांचा ब्रह्मपुरी गावाजवळ मृत्यू झाला. नीलकंठ गेडाम यांचा गुरूवारी सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. लतीफ निंदेकार यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.