दोन लाख पाठ्यपुस्तके पोहोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 01:39 AM2016-05-25T01:39:12+5:302016-05-25T01:39:12+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या ...
पहिल्या टप्प्यात : इयता पहिली ते आठवीच्या १ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके
गडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्याची योजना राबविली जात आहे. याअनुषंगाने जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. गडचिरोली, चामोर्शी व अहेरी या तीन तालुक्याच्या गटसाधन केंद्रात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत २ लाख ३३ हजार पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत.
जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या कायम राखण्याच्या उद्देशाने शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहे. यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके वितरण, गणेवश व इतर योजनांचा समावेश आहे. रविवारी चामोर्शी तालुक्याच्या गटसाधन केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीचे मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांचे मिळून ७६ हजार पाठ्यपुस्तके पोहोचली.
अहेरी तालुक्यासाठी येथील गटसाधन केंद्रात ७७ हजार तर गडचिरोली येथील गट साधन केंद्रात ८० हजार पाठ्यपुस्तके मंगळवारी पोहोचली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २६ जूनला पुस्तके मिळण्याबाबत नियोजन करण्यात येते. शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील एकूण १ लाख २१ हजार ६८७ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मंगळवारी गडचिरोली येथील गटसाधन केंद्रात गडचिरोली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके घेऊन ट्रक पोहोचला. यावेळी जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी उकंडराव राऊत यांनी गटसाधन केंद्राला भेट देऊन पाठ्यपुस्तकाची पाहणी केली. शाळेच्या पहिल्या दिवशी जि.प., न.प. व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
मे अखेरपर्यंत सर्व तालुक्यांत पुस्तके पोहोचणार
अहेरी, गडचिरोली व चामोर्शी या तीन तालुक्याच्या ठिकाणी पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. उर्वरित धानोरा, देसाईगंज, आरमोरी कोरची, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा या सात तालुक्याच्या गटसाधन केंद्रात ३१ मे पर्यंत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके पोहोचणार आहेत, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी उकंडराव राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली.
२,५०९ विद्यार्थ्यांना बंगाली माध्यमांचे पुस्तके मिळणार
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून बंगाली माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बंगाली माध्यमांचे पाठ्यपुस्तके उपलब्ध होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये बंगाली माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ३६९ आहे. मुलचेरा तालुक्यातील एकूण १ हजार १४० विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथीचे शिक्षण बंगाली माध्यमातून घेत आहे. जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने बंगाली माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या एकूण २ हजार ७०९ विद्यार्थ्यांसाठी बंगाली भाषेतील पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यानंतर सदर पुस्तके संबंधित विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.