दोन लाखांवर कुटुंबांना गणेशोत्सवात मिळणार रवा, डाळ, तेल अन् साखर !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 04:48 PM2024-07-27T16:48:02+5:302024-07-27T16:50:43+5:30
आनंदात भर : चार शिधा जिन्नसचे होणार वाटप, नियतन मंजुरीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वस्त धान्याचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना सणासुदीच्या काळात मदत व्हावी, यासाठी मागील वर्षीपासून 'आनंदाचा शिधा' वितरीत केला जात आहे. शासनाकडून यावर्षीसुद्धा गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे.
जिल्ह्यातील २ लाख १५ हजारांवर पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. सणानिमित्त आनंदाचा शिधा शासनाकडून वाटप करण्यात येत आहे. यंदा गौरी-गणपतीच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
गणपतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा
- सणानिमित्त सरकार आनंदाचा शिधा वाटप करत आहे. रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येतो.
- अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांनादेखील आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल.
तालुका अंत्योदय प्राधान्य एकूण
गडचिरोली ८,८५३ १७,४७० २६,३२३
धानोरा १०,६३० ४,३२७ १४,९५७
चामोर्शी १२,६४० २७,२९८ ३९,९३८
मुलचेरा ५,२४६ ४,७८७ १०,०३३
देसाईगंज ४,२९३ ११,९४० १६,२३३
आरमोरी ५,६६२ १६,३७६ २२,०३८
कुरखेडा ११,२१७ ६,५८७ १७,८०४
कोरची ४,७९४ ४,०३५ ८,८२९
अहेरी १२,१८० ८,१७० २०,३५०
एटापल्ली ९,७३० ३,६०६ १३,३३६
भामरागड ५,६२० १,९२५ ७,५४५
सिरोंचा ७,७५७ ६,८९८ १४,६५५
काय काय मिळणार?
- गौरी-गणपतीच्या सणाला १०० रुपयांमध्ये १ किलोच्या परिमाणात रवा, चणा डाळ, साखर व एक लिटर खाद्यतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
- मागील वर्षी अन्य दोन जिन्नसचा समावेश करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा सुरुवातीला ज्या जिन्नसचा पुरवठा करण्यात आला. त्याच वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार आहे.
१५ ऑगस्टपासून होणार वितरण
१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत ई-पॉस मशिनवरून लाभार्थी पडताळून आनंदाच्या शिधाचे वितरण केले जाणार आहे. यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना फायदा होईल. गौरी-गणपतीचा उत्सव उत्साहात साजरा होईल.
"पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. मागील वर्षीसारखेच योग्य पद्धतीने शिधाचे वितरण केले जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. नियतन मंजूर झाल्यानंतर आदेशानुसार वितरण केले जाईल."
- दीपक नागरगोजे, पुरवठा निरीक्षक