आणखी दोन जहाल महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Published: June 27, 2024 06:34 PM2024-06-27T18:34:09+5:302024-06-27T18:34:34+5:30

१६ लाखांचे होते बक्षीस : नक्षल चळवळीत कमांडरपदी होत्या सक्रिय

Two more Jahal women Maoists surrender | आणखी दोन जहाल महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण

Two more Jahal women Maoists surrender

गडचिरोली: नक्षल्यांचा रणनीतीकार व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने पत्नी संगीतासह आत्मसमर्पण केल्यानंतर माओवाद्यांना आठ दिवसांत आणखी एक धक्का बसला आहे. माओवाद्यांसाठी कमांडर पदावर काम करणाऱ्या दोन जहाल महिला नेत्यांनी२७ जूनला आत्मसमर्पण केले आहे. त्या दोघींवर प्रत्येकी आठ लाख रुपयांप्रमाणे १६ लाखांचे बक्षीस होते. 

बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे (२८,रा. झारेवाडा ता. एटापल्ली) व शशीकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीष उईके (२९,रा. कटेझरी ता. धानोरा) अशी त्यांची नावे आहेत. माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० च्या प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य म्हणून त्या दोघी काम करायच्या.  बाली ही २०१० मध्ये नक्षल चळवळीत सदस्य म्हणून गट्टा दलममध्ये भरती झाली होती. वर्षभरातच तिची अहेरी दलममध्ये बदली झाली. २०१६ मध्ये अहेरी दलममधून कंपनी क्र. १० मध्ये बदली होऊन कार्यरत झाली. २०२१ मध्ये तिला प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य म्हणून बढती मिळाली.   तिच्यावर एकूण २१ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १० चकमक,  जाळपोळ, अपहरण प्रत्येकी एक व इतर ९ गुन्ह्यांचा समावेश आहे. शशीकला ऊईके हिने २०११ मध्ये टिपागड दलममधून नक्षल चळवळीत प्रवेश केला. कंपनी क्र. ४ व नंतर १० मध्ये तिची बदली झाली. २०२३ मध्ये तिला बढती मिळाली. प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरीया कमिटी सदस्य या पदावर ती कार्यरत होती. तिच्यावर ८ गुन्हे दाखल असून सहा चकमक व दोन इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.   

दोघींना मिळणार प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून बाली नरोटे व शशीकला उईके या दोघींना प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. याशिवाय घरकुल व इतर योजनांचा लाभ देखील दिला जाणार आहे.

अडीच वर्षांत १९ जणांनी सोडली गुन्हेचळवळ

पोलिसांच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेंतर्गत २०२२ पासून आतापर्यंत अडीच वर्षांत १९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील,उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी यासाठी परिश्रम घेतले. नक्षल्यांनी गुन्हेगारी चळवळ सोडून आत्मसमर्पण करुन सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.
 

Web Title: Two more Jahal women Maoists surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.