सहा नक्षल समर्थकांसह दोन नक्षलवादी अटकेत, एकाचे आत्मसमर्पण, नक्षल चळवळीला हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:52 AM2017-10-19T04:52:47+5:302017-10-19T04:53:23+5:30
सहा नक्षल समर्थकांसह दोन नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, एका जहाल नक्षलवाद्याने कोठी पोलीस मदत केंद्रात आत्मसमर्पण केले आहे.
गडचिरोली : सहा नक्षल समर्थकांसह दोन नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, एका जहाल नक्षलवाद्याने कोठी पोलीस मदत केंद्रात आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे हिंसक नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
कोरके पल्लो (६०), अशोक सोमनकर (५५), सुरू पुंगाटी (६०), संतोष भांडेकर (३५), बंडू गेडाम (४५), जोगे मज्जी (६५, सर्व रा. धोडराज ता. भामरागड) अशी १४ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आलेल्या नक्षलसमर्थकांची नावे आहेत. तसेच भामरागड नक्षल दलमध्ये कार्यरत असलेला जहाल नक्षल सदस्य रैैनू काना पुंगाटी (३५, रा. गोंगवाडा ता. भामरागड) याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. तो १० वर्षांपासून नक्षल दलमध्ये कार्यरत होता. भूसुरूंग स्फोट व अन्य अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता, अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली. तसेच कंपनी क्रमांक ४ चा जहाल नक्षलवादी जयलाल उर्फ पुसू मट्टामी (२७, ता. एटापल्ली) याला ११ आॅक्टोबर रोजी नक्षलविरोधी अभियानादरम्यान अटक करण्यात आली.
कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत असलेला जहाल नक्षलवादी सतीश उर्फ कोसा आडमे सोडी जि. सुकमा (छत्तीसगड) याने मंगळवारी कोठी पोलीस मदत केंद्रात आत्मसमर्पण केले. कोसा सोडी हा अल्पवयीन असताना त्याला जबरदस्तीने नक्षल चळवळीत भरती करण्यात आले़