दुचाकी अपघातात दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2016 01:04 AM2016-02-09T01:04:57+5:302016-02-09T01:04:57+5:30
गडचिरोलीकडून चामोर्शीकडे जाणाऱ्या चामोर्शी पंचायत समितीच्या बोलेरो वाहनाने चामोर्शीवरून तळोधीकडे येणाऱ्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली.
घटनास्थळावर तणाव : चामोर्शी पं.स.च्या शासकीय वाहनाने दिली धडक
तळोधी (मो.) : गडचिरोलीकडून चामोर्शीकडे जाणाऱ्या चामोर्शी पंचायत समितीच्या बोलेरो वाहनाने चामोर्शीवरून तळोधीकडे येणाऱ्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या घटनेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. सदर अपघात सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी झाला. घटनेनंतर पोलिसांनी नातेवाईकांना येऊ न देताच रस्त्यावरील मृतदेह उचलून दवाखाण्यात नेले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांना आल्याशिवाय व संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह उचलू नका, असे नागरिकांचे म्हणणे होते. यावेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला.
एमएच ३३ सी ०३४६ ही पं.स.ची बोलेरो गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात असताना एमएच ३३ एल ४५०३ या विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीला तळोधी जवळील क्रॉसींगवर जोरदार धडक दिली. या घटनेत खोर्दा येथील रहिवासी विलास मोहंदा (४०) व शालिकराम अगणीतवार (५०) हे जागीच ठार झाले. अपघात होताच पंचायत समितीच्या चारचाकी वाहनातील प्रवास करणारे घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच चामोर्शीचे पोलीस उपनिरिक्षक खंडारे, उपनिरिक्षक सुंदरकर, देशमुख, ढोरे, म्हरस्कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेले मृततदेह ते दवाखाण्यात हलविले.
यावेळी नागरिकांनी हे मृतदेह उचल करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे पोलीस व नागरिक यांच्यामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. (वार्ताहर)