आत्मसमर्पित नक्षली जोडपी अडकली विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 04:24 PM2018-04-29T16:24:55+5:302018-04-29T16:53:37+5:30
पोलिसांच्या पुढाकारानं ९७ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा
गडचिरोली : सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ९७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. विशेष म्हणजे यात दोन आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचाही समावेश आहे. नक्षल चळवळीतून बाहेर आल्यानंतरच आमच्या जीवनाला खरी सुरूवात झाली असून चळवळीतील जीवनापेक्षा बाहेरचे जीवन कितीतरी चांगले आहे, अशी भावना त्यांनी या सोहळ्यानंतर व्यक्त केली. पोलीस प्रशासन, मैत्री परिवार संस्था नागपूर, धर्मदाय आयुक्त नागपूर आणि साईभक्त साईसेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त पुढाकारानं हा अनोखा सोहळा गडचिरोलीत पार पडला.
अतिशय नियोजनबद्धरित्या आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार ही जोडपी विवाहबद्ध झाली. भुमकांनी (आदिवासी पुजारी) विधिवत हा समारंभ पार पाडला. भव्य अशा शामियान्यात पोलीस उपविभागनिहाय वेगवेगळे कप्पे तयार करून जोडप्यांना बसविण्यात आलं होतं. प्रत्येक कप्प्यात मोहाच्या झाडाच्या साक्षीनं पाच दिव्यांभोवती सात फेरे घेऊन आदिवासी भाषेत मंगलाष्टकं झाली. प्रत्येक मंगलाष्टकानंतर जोडप्यांवर अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. वऱ्हाड्यांच्या जेवणापासून तर सोहळ्याचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केलं होतं. मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी व सदस्य त्यासाठी झटताना दिसत होते. या सोहळ्यानंतर गडचिरोली शहराच्या मुख्य रस्त्यावरून ३० ट्रॅक्टरमधून नवदाम्पत्याची फेरवरात काढण्यात आली.
यावेळी जिल्ह्याचे खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारीगण आणि जिल्हाभरातून आलेले वºहाडी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. पोलीस आणि आदिवासी समाजात जवळीक वाढवण्यासाठी त्यांना अधिकृत विवाहाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. या माध्यमातून नवविवाहित दाम्पत्यांना विविध योजनांचा लाभ मिळेल, असं या सोहळ्याचं आयोजन केल्याचं पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितलं.
'आतापर्यंत अंधारातच जगत होतो'
या सामूहिक विवाहात नक्षल चळवळीतून बाहेर येऊन आत्मसमर्पण केलेले दीपक आणि छाया तसेच रैनू आणि रूची या पूर्वाश्रमीच्या नक्षलींनी विवाहबद्ध होऊन नवीन जीवनाला सुरूवात केली. नक्षल चळवळीतील जीवन आणि आताचे जीवन यात काय फरक आहे? असा प्रश्न त्यांना केला असता, आतापर्यंत आम्ही अंधारातच जगत होतो. आता खऱ्या अर्थानं जीवनाला सुरूवात झाली आहे. अल्पवयात बंदुकीचं आकर्षण असल्यानं नक्षल चळवळीकडे आकृष्ट झालो होतो. कुटुंबियांनी विरोध केला, पण नक्षल नेत्यांनी त्यांनाच धमकावलं. आता मात्र कोणताही त्रास नसून मोकळे वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.