चितळाची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वनकोठडी
By admin | Published: March 19, 2017 01:51 AM2017-03-19T01:51:59+5:302017-03-19T01:51:59+5:30
वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नवीन वाकडी येथे चितळाची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या
चामोर्शी : वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नवीन वाकडी येथे चितळाची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी १५ मार्च रोजी ताब्यात घेतले होते. १६ मार्च रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
राजेंद्र दिलीप सोमनकर, संदीप बाबाजी बारसागडे सर्व रा. नवीन वाकडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १५ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान गावठी कुत्र्यांनी नर चितळाचा पाठलाग करून चितळाला गावाजवळ आणले. आरोपी राजेंद्र सोमनकर व संदीप बारसागडे यांनी चितळाचा पाठलाग करून वाकडी येथील भिवरूभाई पाल यांच्या शेतात चितळाला ठार केले. त्यानंतर चितळ कापून हिस्से टाकण्याच्या तयारीत असताना वन विभागाचे बी. डी. राठोड घटनास्थळावर पोहोचले. घटनास्थळावर मृत चितळाचे कापलेले मांस, चामडे, पेटी व कापण्याचे व इतर साहित्य आढळून आले. राठोड यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर वन परिक्षेत्राधिकारी चामोर्शी, क्षेत्र सहायक व इतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या दोघांविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयाने १९ मार्चपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास वन परिक्षेत्राधिकारी के. आर. धोंडणे करीत आहेत. सदर कारवाई वन परिक्षेत्राधिकारी धोंडणे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक आर. डी. तोकला, बिट वनरक्षक बी. डी. राठोड, वनरक्षक के. ए. वैरागडे, डी. एस. कायते, व्ही. आर. जामुनकर, एन. ए. कुमरे, डी. टी. बोरकर यांनी केली. (शहर प्रतिनिधी)