लाकूड बिट वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी अडविले
By admin | Published: March 26, 2017 12:42 AM2017-03-26T00:42:21+5:302017-03-26T00:42:21+5:30
निमनवाडा येथील वन समितीने कापलेले जळाऊ लाकूड बिट वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी २३ मार्च रोजी अडविले.
निमनवाडातील प्रकार : वन विभागाकडे प्रलंबित मजुरीचा मुद्दा ऐरणीवर
रांगी : निमनवाडा येथील वन समितीने कापलेले जळाऊ लाकूड बिट वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी २३ मार्च रोजी अडविले. त्यानंतर २४ मार्च रोजी शुक्रवारी गावाच्या चौकात उभे असलेले सदर दोन ट्रॅक्टर पोलिसांची मदत घेऊन वन विभागाने रांगी येथील वन कार्यालयात आणले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
रांगी येथे वन विभागाचे उत्तर व दक्षिण असे दोन बिट असून दक्षिणेकडील निमनवाडा बिटात शिवटोला व भुसानटोला या गावाचा समावेश होतो. निमनवाडा बिटातील वाघभूमी कुप क्रमांक ५ च्या कक्ष क्रमांक ४४६ मधील जंगल वन समितीच्या नियंत्रणाखाली आहे. वनसंपत्ती अंतर्गत येथील जंगलाची कटाई करण्यात आली. कटाई केलेले जळाऊ लाकूड बिट नेण्यासाठी दोन ट्रॅक्टर भाडेतत्वावर घेण्यात आले. एमएच ३३ एफ ४४१४ व एमएच ३३ एफ २४८५ क्रमांकाचे दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जळाऊ लाकूड बिट भरण्यात आले. लाकूड बिट रांगी येथील वनक्षेत्र सहायक कार्यालयात नेत असताना निमनवाडा गावात लोकांनी हे दोन्ही ट्रॅक्टर अडविले. याबाबत गावातील लोकांना विचारणा केली असता, लोकांची मजुरीची रक्कम प्रलंबित आहे. वन समितीची वर्षभरात सभाच घेण्यात आली नाही. संबंधित बिट वनरक्षक गावात येत नाही. जोपर्यंत मजुरीची रक्कम दिली जात नाही. तोपर्यंत ट्रॅक्टर येथून पुढे नेऊ देणार नाही, अशी भूमिका लोकांनी घेतली. त्यानंतर वन विभागाने धानोरा पोलिसांची मदत घेऊन दोन्ही ट्रॅक्टर रांगीला हलविले. रांगी येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून लाकूड बिट खाली करण्यात आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
काय म्हणतात नागरिक?
गावातील लोकांची मजुरीची रक्कम वर्षभरापासून प्रलंबित आहे. चापल कटाई, वनाची राखणी आदीची रक्कम शिल्लक आहे. तसेच गावातील १० लोकांना गॅस कनेक्शन मिळवून देतो, असे सांगून वनरक्षकांनी २ हजार ७०० प्रमाणे लोकांकडून पैसे घेतले. वर्ष उलटूनही गॅस कनेक्शन मिळाले नाही. गॅस कनेक्शनच्या या रक्कमेची पावती वनरक्षकांनी दिली नाही, अशी माहिती निमनवाडा येथे नानाजी कुमरे, कलिराम जांगी, गणेश जांगी सुखदेव कुमरे, रामजी आतला, अनिता कुमरे, सायत्रा नरोटे, अर्चना कुमरे, वसंती जांगी यांनी दिली. सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या सर्व नागरिकांनी केली आहे.