गडचिरोलीचा दोन ट्रक झाडू पोहोचला नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:48 AM2018-06-03T00:48:29+5:302018-06-03T00:48:29+5:30
गडचिरोली शहरापासून नजीक असलेल्या चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजाची ५० घरांची वस्ती आहे. या वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील महिला व पुरूषांना व्यवसायाबाबत माविमच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून १ लाख २० हजार रूपयांची गुंतवणूक करून तब्बल दोन ट्रक झाडू नागपुरात पाठवून त्याची विक्री करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरापासून नजीक असलेल्या चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजाची ५० घरांची वस्ती आहे. या वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील महिला व पुरूषांना व्यवसायाबाबत माविमच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून १ लाख २० हजार रूपयांची गुंतवणूक करून तब्बल दोन ट्रक झाडू नागपुरात पाठवून त्याची विक्री करण्यात आली आहे. माविमच्या पुढाकाराने कैकाडी समाजाच्या या व्यवसायाला उभारी आली असून आता कैकाडी समाजाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.
कैकाडी समाजाच्या वस्तीतील नागरिक सिंदीच्या पानापासून पारंपारिक पध्दतीने झाडू तयार करून विकतात याशिवाय केसाच्या बदल्यात भांडे देणे, भंगार विक्री आदी व्यवसाय करीत असतात. मात्र या व्यवसायातून कैकाडी समाजातील नागरिकांना फारसे उत्पन्न प्राप्त होत नाही. या समाजातील नागरिकांना व्यवसाय व कौशल्याबाबत मार्गदर्शन करून सामुहिकरित्या प्रोत्साहित केल्यास त्यांची आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल होऊ शकते. हे माविमच्या अधिकाऱ्यांनी ओळखले. त्यानंतर नगर परिषद गडचिरोली व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कैकाडी समाजाच्या वस्तीला भेट देऊन समाज बांधवांशी चर्चा करण्यात आली. या दरम्यान या कैकाडी वस्तीत तीन गट स्थापन करण्यात आले. मेरी, जय जगन्नाथ व महिमा असे तीन गट स्थापन झाल्यावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत प्रती गट १० हजार याप्रमाणे ३० हजार रूपये उपलब्ध करून देण्यात आले. त्यांच्या पारंपारिक झाडू तयार करण्याच्या कलेला चालना देण्यात आली. ३० हजार रूपये गुंतवणुकीवर आठ हजार रूपयांचा शुध्द नफा गटाला मिळाला. त्यानंतर दिवाळी सणाच्या काळात प्रत्येक घरी स्वच्छतेचे काम हाती घेतले जाते. या काळात सिंदीच्या झाडूला मोठी मागणी आहे. शहरी भागातही या झाडूला चांगली पसंती आहे. त्यामुळे कैकाडी समाज वस्तीतील महिलांनी पुन्हा या व्यवसायात गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय घेतला. ५० हजार रूपये कर्जाचा प्रस्ताव गटाने जिल्हा सहकारी बँकेकडे सादर केल्यानंतर प्रत्येक गटाला ४० हजार रूपयांचे कर्ज मिळाले. तीन गटाचे मिळून १ लाख २० हजारांची गुंतवणूक करून दोन ट्रक झाडू नागपुरला विक्रीसाठी बाजारात पाठविण्यात आले.
आणखी दोन गटाची व्यवसायासाठी तयारी
गडचिरोलीनजीकच्या कैकाडी वस्तीतील महिला व पुरूषांनी तयार केलेला दोन ट्रक झाडू नागपुरात पाठविल्यानंतर ठोक बाजारात नेण्यात आले. येथे ठोक स्वरूपात गडचिरोलीपेक्षा अधिक भावाने झाडू विकण्यात आला. वाहनभाडे व इतर खर्च वजा करून १० हजार रूपयामागे दोन हजार रूपयांचा निव्वळ नफा या वस्तीतील समाज बांधवांनी मिळविला. व्यवसायातील ही प्रगती पाहून या वस्तीतील आणखी काही महिला पुढे सरसावल्या असून येथे दोन नवे गट स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांनी तयारी दर्शविली आहे. या गटांना मार्गदर्शन व कर्ज पुरवठा करून व्यवसायात मदत करण्याचे काम माविमच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा यांच्याकडून होणार आहे.