सोनापूरजवळच्या अपघातातील जखमी दुचाकीस्वार नर्सचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:28+5:302021-05-29T04:27:28+5:30
चामोर्शी : दोन दिवसांपूर्वी चामोर्शी ते आष्टी मार्गावरील सोनापूरजवळ पोलीस वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार नर्सचा उपचारादरम्यान ...
चामोर्शी : दोन दिवसांपूर्वी चामोर्शी ते आष्टी मार्गावरील सोनापूरजवळ पोलीस वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार नर्सचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
गडचिरोलीवरून अहेरीकडे जाणारे अहेरीतील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाच्या वाहनाने धडक दिली होती. सोनापूर येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिपरिचारिका सुषमा खुशाल दुर्गे (३२ वर्ष) यांची ॲक्टिव्हा पोलिसांच्या वाहनाखाली येऊन त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. चामोर्शी येथील बोमनवार शाळेत कोरोना लसीकरणासाठी त्या कर्तव्यावर आपल्या दुचाकीने येत असताना हा अपघात झाला. सुषमा दुर्गे यांच्यावर आधी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अधिक उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर जखमी असल्याने तेथून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालात दाखल करण्यात आले. २७ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील माहेर तर सावली हे सासर असलेल्या सुषमा दुर्गे सोनापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात अधिपरिचारिका म्हणून कंत्राटी पद्धतीने नोकरीवर होत्या. त्यांचे पती हेमंत पाटील हे भेंडाळा येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. त्यांना ७ वर्षाची मुलगी आणि ३ वर्षांचा मुलगा आहे.
अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देणाऱ्या अधिपरिचारिकेच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सोनापूर फाट्याजवळ यापूर्वी अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले नाही. भविष्यात अपघात रोखण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
===Photopath===
280521\img-20210528-wa0192.jpg
===Caption===
मृतक सुषमा दुर्गे यांचा फोटो