दोन दिवसांत ५०० वर दुचाकी गाड्यांची विक्री
By admin | Published: April 1, 2017 01:54 AM2017-04-01T01:54:49+5:302017-04-01T01:54:49+5:30
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीएस ४ नियमावलीचे अनुपालन न करणारी नवी वाहने १ एप्रिल २०१७
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम : शहरातील सर्वच शोरूममध्ये खरेदीदारांची तोबा गर्दी
गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीएस ४ नियमावलीचे अनुपालन न करणारी नवी वाहने १ एप्रिल २०१७ पासून विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय दिला व अशी वाहने विकण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत दिली. त्यामुळे गडचिरोली शहरासह तालुका मुख्यालय ठिकाणच्या वितरकांनी बीएस ३ ची दुचाकी वाहने खरेदीत ग्राहकांना भरघोस सूट दिली. कमी किमतीत दुचाकी गाड्या खरेदी करण्यासाठी गडचिरोली शहरातील होंडा, हिरो, टीव्हीएस या शोरूममध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. गुरूवार व शुक्रवारी या दोन दिवसांत गडचिरोली जिल्ह्यात ५०० वर दुचाकी गाड्यांची विक्री झाली आहे.
बीएस ३ नियमावलीचे अनुपालन करणारी शेकडो दुचाकी वाहने गडचिरोली येथील वितरकांकडे शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध होती. मात्र न्यायालयाच्या निर्णयाने ही वाहने विक्रीस १ एप्रिलपासून बंदी घातल्याने सदर वाहने विकण्यासाठी कंपन्यांनी भरघोस सवलतीची घोषणा केली. दुचाकी गाड्यांची किमत कमी झाल्याचे कळताच गडचिरोली शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी शोरूममध्ये गर्दी करून सवलतीत दुचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दुचाकी खरेदीत भरघोस सूट मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. त्यामुळे गडचिरोली शहरातील शोरूम रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होते. एक वितरक तर चक्क ६८ हजारची गाडी ५० हजारात न्या, असे ग्राहकांना सांगून वाहनांची विक्री करीत होता.