अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दोन वर्षांची शिक्षा
By Admin | Published: August 15, 2015 12:14 AM2015-08-15T00:14:48+5:302015-08-15T00:14:48+5:30
देसाईगंजच्या तत्कालीन महिला मुख्याधिकारी यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विष्णू राजाराम वैरागडे
मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण : देसाईगंज येथील पॅथालॉजी संचालक गोत्यात
गडचिरोली : देसाईगंजच्या तत्कालीन महिला मुख्याधिकारी यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विष्णू राजाराम वैरागडे रा. देसाईगंज (४०) याला जिल्हा सत्र व दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्षांची शिक्षा व दोन हजार रूपये दंड ठोठावला आहे.
देसाईगंज येथील विष्णू पॅथालॉजी चालक विष्णू राजाराम वैरागडे याच्याकडे असलेल्या डीएमएलटी या पदविकेची मूळ कागदपत्रे तपासावे, असे निर्देश तत्कालीन महिला मुख्याधिकारी यांना प्राप्त झाले होते. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी वैरागडे याला मूळ कागदपत्र तपासणीबाबतचे पत्र दिले. मात्र वैरागडे याने मूळ कागदपत्रे सादर न करता ३१ मे २०१० रोजी कागदपत्रांची झेरॉक्स प्रत नगर परिषदेच्या आवक/जावक विभागात सादर केले. मूळ कागदपत्रांसह नगर परिषदेत उपस्थित राहण्यास सांगितले असता, आरोपीने फिर्यादीसह मोबाईलवरून जातीवाचक शिवीगाळ केली. कागदपत्रे तपासणीसाठी मुख्याधिकारी त्या ठिकाणी गेल्या असता, त्यांचा विनयभंगसुध्दा केला. या प्रकरणाची तक्रार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. याबद्दलचा खटला न्यायालयात दाखल करण्यात आला. या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला असून न्यायालयाने आरोपी विष्णू वैरागडे यास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार एक वर्षांची शिक्षा, कलम ३५४ अंतर्गत सहा महिने व ३५३ अंतर्गत सहा महिने असे एकूण दोन वर्षांची शिक्षा व दोन हजार रूपयांचा दंड सुनावला. सदर शिक्षा अप्पर सत्र न्यायाधिश यु. एम. पदवाड यांनी सुनावली. सरकारी पक्षातर्फे सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)