दोन वर्षांपासून शौचालयांचे अनुदान रखडले
By admin | Published: May 4, 2017 01:26 AM2017-05-04T01:26:15+5:302017-05-04T01:26:15+5:30
सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत शाळेत शौचालय बांधण्यासाठी मुख्याध्यापकांना केवळ ५० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला.
मुख्याध्यापक अडचणीत : शौचालय बांधकामाचा अर्धाच निधी मिळाला
गडचिरोली : सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत शाळेत शौचालय बांधण्यासाठी मुख्याध्यापकांना केवळ ५० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला. काही मुख्याध्यापकांनी स्वत:कडचे पैसे वापरून शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूूनही अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक अडचणीत आले आहेत.
सर्वशिक्षा अभियानअंतर्गत शौचालय बांधकामासाठी अर्धाच निधी उपलब्ध करून दिला. मात्र शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचे सक्त निर्देश शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिले. आपल्यावर कारवाई होईल, या भीतीपोटी काही मुख्याध्यापकांनी स्वत:कडचे जवळपास ५० हजार रूपये टाकून शौचालयाचे बांधकाम केले. शौचालयाचा उर्वरित निधी काही दिवसात मिळेल, असे सांगण्यात येत होते. शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फोटोसह उपयोगीता प्रमाणपत्र सर्वशिक्षा अभियानकडे सादर केले. मात्र अजूनपर्यंत उर्वरित रक्कम देण्यात आली नाही. काही मुख्याध्यापकांनी बांधकाम साहित्य उधारीवर आणून शौचालयाचे बांधकाम केले. मात्र आता दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अनुदान मिळाले नाही. सर्वशिक्षा अभियान विभागाच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला आहे. जेवढा निधी होता तेवढेच शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देणे आवश्यक होते. मात्र दुप्पट उद्दिष्ट दिल्याने मुख्याध्यापक अडचणीत आले आहेत. आंदोलन करण्याचा इशारा मुख्याध्यापकांनी दिला आहे.