दोन वर्षानंतर यावर्षी पुन्हा मलेरियाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:00 AM2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:51+5:30
जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळेच मलेरिया, डेंग्यु अशा डासजन्य आजारांचे प्रमाणही या जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असते. गेल्या पाच वर्षाच्या मलेरिया रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१४ मध्ये ९१६३ मलेरिया रुग्ण आढळून ४ जणांचा मृत्यू झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यभरात सर्वाधिक मलेरिया, डेंग्युचे रुग्ण आढळणाऱ्या गडचिरोलीत गेल्या दोन वर्षात डासजन्य आजारांचे प्रमाण बरेच कमी झाले होते. परंतू यावर्षी पुन्हा मलेरियाने डोके वर काढले आहे. जुलै अखेरपर्यंतच्या सात महिन्यात ३३६४ जणांना मलेरियाची लागण होऊन त्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्यामुळे जिकडे-तिकडे पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून मलेरियाचा उद्रेक आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळेच मलेरिया, डेंग्यु अशा डासजन्य आजारांचे प्रमाणही या जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असते. गेल्या पाच वर्षाच्या मलेरिया रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१४ मध्ये ९१६३ मलेरिया रुग्ण आढळून ४ जणांचा मृत्यू झाला होता.
२०१७ मध्ये ५४८४ रुग्ण आढळले आणि ५ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ पासून हे प्रमाण कमी झाले. त्या वर्षी २५८४ रुग्ण आढळून ३ जणांचा मृत्यू झाला तर २०१९ मध्ये २४२८ जणांना मलेरियाची लागण होऊन केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यावर्षी मात्र ७ महिन्यातच ५ मृत्यू झाल्यामुळे उर्वरित ५ महिन्यात किती जणांना मलेरियाची बाधा होऊन किती मृत्यू होतील हे सांगता येत नाही.
यावर्षी ५५६ गावांमध्ये २२२ हंगामी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डासनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन जिल्हा हिवताप कार्यालयाने केले होते. त्यासाठी प्रत्येकी ६ लोकांची एक टीम अशा ३७ टीम बनविल्या. जून-जुलैमधील पहिल्या फवारणीनंतर दुसरी फवारणी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात केली जाणार आहे. परंतू जंगलालगतच्या अनेक दुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी मार्गच बंद राहात असल्यामुळे ही फवारणी कशी केली जाणार हे कळायला मार्ग नाही.
यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांना विचारणा करण्यासाठी वारंवार संपर्क केला, मात्र त्यांनी मोबाईल कॉल स्वीकारला नाही.
मच्छरदाण्या वाटपावर प्रश्नचिन्ह
गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात मच्छरदाण्यांचे वाटप झाले नाही. तरीही मलेरिया नियंत्रणात होता. यावर्षी आरोग्य विभागाकडून तब्बल ४ लाख ६९५ मच्छरदाण्या देण्यात आल्या. त्या १३७७ गावांमध्ये वाटप केल्या जात असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मिळालेल्या त्या मच्छरदाण्या गरजवंत गावांपर्यंत पोहोचल्या का, आणि तालुकास्थळापर्यंत पोहोचलेल्या मच्छरदाण्या गरजवंतांपर्यंत पोहोचल्या का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसामुळे आणखी वाढणार रूग्ण
विशेष म्हणजे यावर्षी ३३६४ जणांना झालेली मलेरियाची लागण ही जोरदार पाऊस येण्याआधीच्या काळातील आहे. जून आणि जुलै महिन्यामिळून झालेल्या पावसापेक्षा आॅगस्ट महिन्यातील पाऊस जास्त आहे. सप्टेंबर महिन्यातही या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे मलेरियाला नियंत्रित करण्याचे खरे आव्हान आता उभे यापुढील काही महिन्यात उभे ठाकणार आहे.
मलेरिया प्रतिरोध महिना कागदावरच
जून महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळला जातो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर महिन्यात राबवायचे विविध कार्यक्रम प्रत्यक्षात कमी आणि कागदावरच जास्त राबविल्या गेले. जून महिना अर्धाअधिक संपेपर्यंत नियोजित कार्यक्रमातील कोणत्याही जनजागृतीपर कार्यक्रमांना सुरूवात झालेली नव्हती. त्यातच निधीही पुरेसा नसल्याचे सांगत अनेक ठिकाणी काटकसर करण्यात आली. मलेरियाचे रुग्ण वाढण्यामागे या सर्व बाबी तर कारणीभूत नाही ना? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.